यशाच्या शिखरावर असलेला बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आज ५० वर्षांचा झाला. हेच औचित्य साधून त्याने चाहत्यांनाच ‘गोल्डन’ भेट दिली. आपल्या आगामी ‘गोल्ड’ चित्रपटाचा पोस्टर त्याने चाहत्यांसाठी शेअर केला.

अक्षयने ट्विटरवर पोस्टर शेअर करत लिहिलं की, प्रत्येक सरत्या वर्षानुसार माझे आयुष्य अधिक चांगले होत असल्याची मला जाणीव आहे. प्रत्येक चित्रपटात मला काहीतरी नवीन शिकायला मिळतेय. माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या चित्रपटाचे पोस्टर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय.

पोस्टर शेअर करण्यापूर्वी अक्षयने त्याचा जन्म झाल्यापासूनचा कालावधी मिनिटे, तास, आठवडे, महिने या स्वरुपात ट्विट केले होते. प्रत्येक ट्विटमध्ये त्याने २,६२,८०,००० मिनिटे, ४,३८,००० तास, २,६०७ आठवडे, ६०० महिने, पाच दशकं असा कालावधी ट्विट केला होता.

दरम्यान, पोस्टरमध्ये सुवर्ण पदकावर अक्षयचा चेहरा पाहावयास मिळतो. तसेच, त्यावर ऑलिम्पिकचे पाच रिंग असलेले चिन्ह आणि ‘XIV Olympiad London १९४८’ असेही लिहलेले दिसते. शीर्षकामागे लोकांनी गच्च भरलेले स्टेडियम दाखवण्यात आलेल्या या पोस्टरवर ‘एक स्वप्न ज्याने संपूर्ण देशाला एकवटले’, ( द ड्रिम दॅट युनायटेड अ नेशन) अशी टॅगलाइनही लिहण्यात आली आहे.

रीमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘गोल्ड’ चित्रपट पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रदर्शित होईल.