बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांच्या निवडीबाबत फार चोखंदळ आहे. त्याचप्रमाणे तो सार्वजनिक विषयांबद्दलही जागरुक असतो. शौचालय बांधणे किती महत्त्वाचे आहे, हे सध्या तो सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या आगामी चित्रपटातून सामाजिक संदेश देणार आहे. तसेच त्याने आता भारतातील बलात्कारांच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी योग्य उपाय सांगितला आहे.

वाचा : … म्हणून खिलाडी कुमार-अजय देवगणमध्ये पडली वादाची ठिणगी

लागोपाठ केलेल्या ट्विटमध्ये अक्षयने काही पोस्टर शेअर करत लिहिलंय की, टिव्ही आहे, मोबाइल आहे पण शौचालय नाही. तुम्हाला माहितीये का, ५६४ मिलियन लोक उघड्यावर शौचालय करतात. शौचालय नसलेली जगभरातील ६० टक्के लोकसंख्या फक्त भारतातच आहे. ही १०० टक्के लज्जास्पद बाब आहे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, शौचालये बांधली तर बलात्काराची प्रकरणे ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतात.

वाचा : तिचं सोडाच पण तिच्या कुत्र्यालाही मी आवडत नाही- सलमान खान

बऱ्याचदा उघड्यावर शौचालयाला जाणाऱ्या महिला बलात्काराच्या घटनेला बळी पडतात. मुख्य म्हणजे अशा घटना भारतात सर्वाधिक घडल्याचे दिसून येते. याविषयी अक्षय म्हणाला की, एका महिलेला लग्न केल्यानंतर पतीच्या घरी शौचालय नसल्याचे कळले. त्यानंतर तिने लगेच घटस्फोटाची मागणी केली. फक्त शौचालयासाठी तिने इतका मोठा निर्णय घेतला. तिचे कौतुक करावे तितके कमी आहे. जर भारतात उघड्यावर शौच करणे पूर्णपणे थांबले तर बलात्काराच्या घटना ३० टक्क्यांनी कमी होतील, असे मी एका ठिकाणी वाचले होते. कारण, ज्यावेळी महिला उघडयावर शौचालयास जातात तेव्हा पुरुष त्यांची तेथे वाट पाहत असतात. हे असं खरंच घडतंय. हे सर्व मुद्दे मी माझ्या चित्रपटात विनोदी पद्धतीने मांडले आहेत.

अक्षयने मांडलेला मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटासाठी अक्षयने याविषयावर बराच अभ्यासही केलाय. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.