करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना देखील करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचं काही खरं नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे.

काय म्हणाला अनुराग?

“देशवासीयांना करोना विषाणूपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. ही सर्व माणसं तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे. जर त्यांना काही झालं तर, कितीही थाळ्या वाजवा किंवा दिवे पेटवा, आपलं काही खरं नाही.” अशा आशयाचं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो नेहमीच आपली मतं बिनधास्तपणे मांडताना दिसतो. देशभरात सध्या करोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.