सुहास जोशी

गाव आणि त्याभोवताली घडणाऱ्या असंख्य गोष्टी हा मराठी चित्रपटक्षेत्रातील एकेकाळचा अगदी हुकमाचा एक्का. किंबहुना एक काळ असा होता की मराठी चित्रपटात केवळ गावच दिसायचं. शहरांना वावच नव्हता. असं असतानादेखील गावकडच्या अनेक गोष्टींची क्रेझ अजूनही तशीच आहे. कारण त्यात असलेला सहजभाव, बेरकीपणा, भोळाभाबडा भाव आणि त्याचबरोबर शहराची असलेली ओढ या सर्वातून प्रत्येक गावात काही ना काही घडत असतेच. अगदी शहरातल्यासारखं रोजचं काहीतरी घडत नसलं तरी जे काही घडतं त्यामध्ये एक सहजभाव असतो. आणि आजच्या भाषेत बोलायचं तर हा अगदी खास विकला जाणारा आशय. तो मांडण्यासाठी वेब सीरिज हे माध्यम तर आणखीनच उत्तम. त्यामुळेच ‘गावाकडच्या गोष्टी’ ही कोरी पाटी प्रॉडक्शनची यूटय़ूबवरील मराठी वेबसीरिज चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

Waghbeel, waste water on road,
वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा, रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

साताऱ्याजवळील एका गावात घडणाऱ्या घटना छोटय़ा छोटय़ा भागाद्वारे यात मांडल्या आहेत. गाव म्हटल्यावर चार तरुण पोरं, त्यातली काही शिकलेली, काही अर्धवट शिक्षण सोडलेली, चार-पाच लहान मुलं, दिवसरात्र झिंगणारं एखादं पात्र, सरपंच, शाळामास्तर, प्रेमप्रकरण असं सारं काही यात आहे. अगदी एक सलग कथानक असं नसलं तरी प्रत्येक भाग म्हणजे वेगळी कथा अशीदेखील रचना येथे नाही. कधी गावात चोरीची आवई उठते, कधी बेंदराची धूम, कधी शाळा तपासणी, गुपचूप सुरू असलेली प्रेमप्रकरणं, कधी एखादा तरुण मुंबईला नोकरीला जातो, कधी एखादं लग्न लागतं, कधी गणपतीतलं नाटक, कधी दहा-बारा पोरं मिळून मटणाचा बेत आखणं असं बरंच काही यातून मांडायचा प्रयत्न केला आहे. या सर्वाच्या मध्यवर्ती गाव सतत आहे.

तीन तासांच्या चित्रपटात टिपिकल साच्यातून कथा काढण्यापेक्षा प्रत्येक भागात काही तरी नवीन पाहायला मिळणं हे नक्कीच चांगलं आहे. नेहमीचे टिपिकल गाव न दाखवता त्यातील छोटय़ा-मोठय़ा अडीअडचणीदेखील मांडण्याचा प्रयत्न यात आहे. सीरिजकर्त्यांनी त्यासाठीचे प्रसंग देखील अगदी वेचक निवडले आहेत. त्यांना गावाची नेमकी कल्पना असल्याचं त्यातून दिसून येतं. त्यामुळे यामध्ये मज्जा आहे.

पण एक दृक्श्राव्य सादरीकरण म्हटल्यावर ज्या काही मूलभूत घटकांबाबत खूप व्यावसायिक राहावं लागतं त्यांची येथे बरीच कमतरता आहे. सीरिजमधील काही प्रसंग तर इतके भन्नाट आहेत की तो प्रसंग प्रत्यक्ष समोरच घडतोय की काय असं वाटतं. पण त्याचवेळी ध्वनिमुद्रण इतकं  सदोष असतं की संवाद कुठच्याकुठे विरून जातात. लग्नाचा भाग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्षात लग्नात होणारा गोंधळ त्यांनी चांगलाच टिपलाय, पण अनेक वेळा संवादच हरवून जातात. सदोष ध्वनिमुद्रणाचा फटका असाच आणखीन काही भागांनादेखील बसला आहे. असाच दुसरा प्रकार म्हणजे कॅमेऱ्याचा वापर. बेंदूर हा भागच अतिशय संवेदनशीलपणे चित्रित झाला आहे. या भागात सुरुवातीला गावाचा, बैलांच्या मिरवणुकीचा टॉप अँगल उत्तम वाटतो, पण पुढे बऱ्याच वेळा वापरल्याने त्यातील मजा निघून जाते.

त्रुटीमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कलाकार. यातील बरेच कलाकार अगदीच साचेबद्ध पद्धतीने काम करताना दिसतात. कॅमेऱ्यासमोरील वावर हा कसा असावा याबद्दल पुरेशी जाण असणारे मोजकेच कलाकार यात दिसून येतात. परिणामी अनेक वेळा नाटकाच्या स्टेजप्रमाणे कलाकारांचे प्रवेश होत राहतात. त्याचबरोबर अनेक संवाद देखील अगदी छापील भाषेप्रमाणे होतात. हे मात्र चांगलंच खटकणारं आहे. कारण लेखकाने ग्रामीण भागातील नियमित शिव्यांचा अगदी व्यवस्थित वापर केला आहे. आणि दुसरीकडे अगदी छापील वाक्य अनेक पात्रांच्या तोंडी घुसडली आहेत.

आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेच्याच्या काही भागांमध्ये सतत एक संदेश देण्याकडे यांचा कल झुकलेला दिसतो. हा संदेश जोपर्यंत वैयक्तिक पातळीवर असतो तोपर्यंत त्यात काही वावगं वाटत नाही. पण सामाजिक पातळीवर जातो तेव्हा तो एकदम शासकीय संदेश सादरीकरणाचा भाग वाटू लागतो. हे पूर्णत: टाळावं लागेल.

अशा त्रुटी असल्या तरी ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यामागचं कारण हे त्या विषयात अधिक आहे. मालिकाकर्त्यांने विषयांची निवड करताना चांगलीच मेहनत घेतली आहे. त्यामध्ये आजच्या परिस्थितीचे अगदी व्यवस्थित प्रतिबिंब दिसून येतं. हे सारे विषय वास्तववादी आहेत. ही या सीरिजची सर्वात मोठी जमेची बाजू.

किंबहुना मराठी वेबसीरिजमध्ये अशा विषयांना घेऊन येणं हे यांचं महत्त्वाचं काम म्हणावं लागेल. कारण आज एकतर हिंदी वेबसीरिजमध्ये अशा विषयांची वानवा आहे. मराठीत इतर जे काही करतात त्यातील अगदी एक-दोन अपवाद सोडले तर बाकीचे सारेच निव्वळ भुक्कड म्हणावेत असे आहेत. अशांमध्ये ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेबसीरिज नक्कीच वेगळी ठरते. निर्मिती प्रक्रियेवर आणि कलाकारांवर थोडी मेहनत घेतली तर ही सीरिज आणखीन उत्कर्ष साधू शकते.