रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉलीवूड अभिनेता – टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन या दोघांनाही करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. करोना विषाणूसंसर्गाच्या भयाने अवघ्या जगाला पछाडले आहे. हॉलीवूडही त्याला अपवाद नाही. मात्र हॉलीवूडमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे, याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली आणि अवघी इंडस्ट्री चिंतातुर झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे चित्रीकरणासाठी असलेल्या टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी दोघांनाही करोनाचा संसर्ग झाला असून सध्या त्यांना काही दिवस वेगळे ठेवण्यात येणार आहे, ही माहिती खुद्द टॉम यांनीच समाजमाध्यमांवरून दिली. प्रसिद्ध गायक एल्विस प्रिस्ले यांच्यावरील चरित्रपटात टॉम यांची महत्त्वाची भूमिका आहे. वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या पूर्वतयारीसाठी टॉम सपत्नीक सिडनी येथे आले होते. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला दोघांनाही अंगदुखी, डोकेदुखीला सामोरे जावे लागले. रिटाला तर सारखा सारखा तापही येत होता. सध्या जगभर करोनाचे सावट असल्यामुळे आम्हीही योग्य ती खबरदारी घेत डॉक्टरी तपासण्या करून घेतल्या. त्यात आम्हाला दोघांनाही संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले. आता पुढे काय? आम्हाला काही दिवस वेगळे ठेवले जाईल. आमच्या आजारासंदर्भातील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, असा संदेश टॉम यांनी समाजमाध्यमांवरून दिला आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या प्रॉडक्शन टीममधील एक जण करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर योग्य ती काळजी घेत संबंधित रुग्णावर उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र आता टॉम आणि रिटा विल्सन दोघांनाही करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याने या चित्रपटाचेही चित्रीकरण थांबवण्यात आल्याचे समजते. खरे तर, उन्हाळी सुट्टय़ा लवकरच सुरू होत असल्याने भारतात हॉलीवूडपट या काळात मोठय़ा संख्येने प्रदर्शित होण्याच्या तयारीत असतात. मात्र, करोनाच्या भयामुळे सध्या चित्रपटांचे प्रदर्शनही लांबणीवर पडले आहे आणि अनेक चित्रपटांची चित्रीकरणेही थांबवण्यात येत आहेत.

माव्‍‌र्हलप्रेमींची निराशा!

‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा पेटारा पुन्हा खुला झाला असून यातल्या चौथ्या टप्प्यातील कथा आता चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून एकापाठोपाठ एक बाहेर पडणार यामुळे माव्‍‌र्हलप्रेमी खुशीत होते. मात्र करोना विषाणूसंसर्गाचे गालबोट इथेही लागले असल्याने हे बाहेर येऊ पाहणारे चित्रपट काही काळ तरी पुन्हा पेटाऱ्यातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी ‘सोनी पिक्चर्स’ने बहुचर्चित अशा ‘नो टाइम टु डाय’ हा बॉण्डपट आणि ‘पीटर रॅबिट २ : द रनवे’ हे दोन्ही चित्रपट पुढे ढकलले आहेत. मात्र डिस्नेने अशी कुठलीही घोषणा अद्याप माव्‍‌र्हलपटांबाबतीत केलेली नाही. त्यातल्या त्यात तूर्तास ‘द फाल्कन अ‍ॅण्ड द विंटर सोल्जर’ या सीरिजचे प्राग शहरात सुरू असलेले चित्रीकरण थांबवले असल्याची घोषणा डिस्नेने केली आहे. ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या चौथ्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेला ‘ब्लॅक विडो’ हा चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ‘इटर्नल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी काहीही करून ‘द फाल्कन अ‍ॅण्ड द विंटर सोल्जर’ आणि ‘वांडाव्हिजन’ या दोन्ही सीरिज एकामागे एक डिस्ने प्लसवर प्रदर्शित होणे गरजेचे आहे. या सगळ्यांची कथानके एकमेकांशी जोडलेली असल्याने चित्रपट आणि वेबसीरिज त्याच क्रमाने प्रदर्शित होणे ही माव्‍‌र्हलची गरज आहे. त्यामुळे ‘द फाल्कन अ‍ॅण्ड द विंटर सोल्जर’चे चित्रीकरण तूर्तास थांबवण्यात आले असले तरी डिस्ने आपल्या माव्‍‌र्हलपटांना नियोजित वेळीच प्रदर्शित करेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यातल्या त्यात डिस्नेने ‘मुलान’, ‘न्यू म्युटन्ट्स’ आणि ‘अ‍ॅन्टलर्स’ या आपल्या तीन मोठय़ा चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. मात्र या सगळ्या गोंधळात ‘ब्लॅक विडो’ तरी ठरल्या वेळी प्रदर्शित होईल असा आशेचा किरण माव्‍‌र्हलप्रेमींच्या मनात पालवला आहे. तो किती खरा आणि किती खोटा हे पुढच्या काही दिवसांतच कळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on coronas shadow on hollywood too abn
First published on: 15-03-2020 at 04:32 IST