स्पॉटबॉय म्हणून १४ व्या वर्षी चित्रपटसृष्टीला जवळून पाहणारा टोनी डिसूझा आज दिग्दर्शक म्हणून ‘अझर’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. ‘अझर’ हा या दिग्दर्शकाचा तिसराच चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट म्हणजे एके काळी भारतीय क्रिकेट संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा आणि रातोरात असंख्य क्रिकेटप्रेमींच्या नजरेत खलनायक ठरलेल्या मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावरचा चरित्रपट नाही. त्याच्या कारकीर्दीत आलेल्या ‘मॅच फि क्सिंग’नामक वादळामागे दडलेली अनेक गुपिते उलगडणारा हा चित्रपट आहे, असे टोनी डिसूझा सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद अझरुद्दीनवर चित्रपट बनवावा, ही माझी कल्पना नव्हती; पण मी स्वत: त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याच्यावरच्या प्रेमातूनच पुढे चांगली मैत्रीही झाल्याचे टोनी म्हणतात. दिल्लीत असताना एका मंत्र्याशी माझी भेट झाली. त्यांना मी अझरची भेट घडवून आणण्याची विनंती केली होती. तेव्हा मी कधी तरी चित्रपट दिग्दर्शक बनेन आणि अझरवर चित्रपट करेन, अशी साधी कल्पनाही केली नव्हती. तरुण होतो, त्याच्या खेळाचा निस्सीम चाहता होतो आणि त्याची केवळ एक स्वाक्षरी मला हवी होती; पण त्या एका भेटीने माझी आणि त्याची घट्ट मैत्री झाली जी आजवर टिकून आहे. त्यामुळे आता जेव्हा मला बालाजी प्रॉडक्शनकडून अझरवर चित्रपट करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा मी ही संधी सोडूच शकत नव्हतो, असे टोनीने स्पष्ट केले. मात्र काहीही झाले तरी अन्य दिग्दर्शकांप्रमाणे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा चरित्रपट आहे, असे सांगण्याचा खोटेपणा मी करणार नाही. अझरच्या आयुष्यात घडलेल्या काही वास्तव घटनांचा माग या चित्रपटात आहे आणि त्या संदर्भातून येणाऱ्या त्याच्या आयुष्याच्या, कारकीर्दीच्या गोष्टी ओघाने चित्रपटात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azhar movie review
First published on: 24-04-2016 at 03:52 IST