इंडस्ट्रीची काहीही माहिती नसताना तिथे आपला शिरकाव करून घेणं फारच अवघड किंबहुना अशक्य मानलं जातं. पुन्हा तुम्ही अगदी घुसलात तरी तिथे तुमचा निभाव लागणं, तुम्ही तिथे टिकून राहणं आणि तुमची योग्य ओळख निर्माण करणं फार कठीण असतं. तुमची अवस्था अभिमन्यूसारखी होऊन जाते. तुम्ही चक्रव्यूह भेदून आत शिरलेले असता पण, बाहेर पडायची माहिती नसल्याने तुम्ही फक्त लढत राहता.. दहा वर्षांच्या संघर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे यशराजसारख्या मोठय़ा बॅनरसाठी ‘बेवकूफियाँ’सारखा वेगळा चित्रपट करणे यात सगळी मेहनत सार्थकी लागली असे म्हणणारी नुपूर अस्थाना ही सगळी किमया कशी झाली, याचीही वैचारिक मांडणी आपल्यापुढे ठेवते.
दिग्दर्शक हबीब फैझलची कथा दिग्दर्शित करायची तेही पदार्पणातला चित्रपट म्हणून..
हबीबची कथा ही आजच्या काळातली आहे. आजच्या पिढीची आहे. तुम्ही कॉर्पोरट जगात वावरता, तुम्हाला भलेलठ्ठ पगाराची नोकरी असते. तुम्ही हुशार असता. तुमच्या हुशारीवर तुम्ही बढत्या घेत जाता. तोपर्यंत तुमचं आयुष्य अगदी छान असतं, तुमचं प्रेम, तुमची बायको, तुमचे नातेवाईक, कार्यालयीन सहकारी, तुमचा पैसा, तुमचे छंद, इतरांची हौस आणि गरजा भागविण्याची तुमची क्षमता सगळ्या गोष्टी जमत असतात. आणि अचानक तुम्हाला आर्थिक मंदीसारखी ठोकर काय लागते. तुमची मोठा पगार, नोकरी, तुमची हुशारी त्याची काहीच किंमत तथाकथित कॉर्पोरेट बाजारात उरत नाही. आणि मग तुमची सगळी जमून आलेली आर्थिक, सामाजिक, भावनिक, छानछौकीची गणितं कोलमडून पडतात. मी स्वत: हे अनुभवलेलं आहे. पैसा आणि काम नसेल तर तुमचा आत्मविश्वास एका क्षणात गळून पडतो हे वास्तव आहे. ‘बेवकूफियाँ’मधून ते थोडंसं हलक्या-फुलक्या पध्दतीने मांडण्याची संधी मला मिळाली आणि ती मी घेतली.
‘बेवकूफियाँ’ हे शीर्षक का?
गीतकार अन्विता दत्तने चित्रपटातील एका प्रसंगासाठी अनुरूप असं गीत लिहिलं होतं. ज्यात ‘बेवकूफियाँ’ हा शब्द होता. तो शब्द या कथेला चपखल आहे. कारण, तुमच्याकडे चांगली नोकरी असते तेव्हा तुम्ही अगदी ब्रँडेड वस्तू वापरता. नसेल तेव्हा तुम्ही काय करता? हा मूर्खपणाच आहे. प्रेमात आपण इतर व्यावहारिक गोष्टींचा विचार करत नाही पण, म्हणजे त्या आपल्याला नकोच असतात असं नाही. म्हणजे आपलाच मूर्खपणा आपण मान्य करत नाही. आणि मायराच्या वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समजा लग्नानंतर जावयाची नोकरी गेली असती तर. म्हणजे हा त्यांचाही मूर्खपणाच की कुठ ल्याही गोष्टीचा आपण मुळातून विचार करत नाही. फारफार वरवर आपण गोष्टी ठरवत असतो आणि तसं वागत असतो त्यामुळे हे शीर्षक अगदी योग्य वाटलं.
दहा वर्षांचा संघर्ष नेमका कसा होता.
शाळेत असल्यापासून मी रंगमंचाशी जोडले गेले आहे. एक लेखिका, दिग्दर्शिका म्हणून कितीतरी नाटकं मी केली. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईत येऊन ‘मास कम्युनिकेश’ची पदवी घेतली. तेव्हा इंडस्ट्रीत शिरायचं कसं माहिती नव्हतं. चित्रपट करायचा तर पैसे कु ठून गोळा करणार हेही समजत नव्हतं. तेव्हा टीव्हीचा पर्याय मी सुरूवात म्हणून निवडला. झी टीव्हीवर ‘हिप हिप र्हुे’ केली आणि ती लोकांना आवडली. मग पुढे गाडी सुरू झाली खरी.. पण, त्यावेळी नायकप्रधानच चित्रपट होते. मी केतन मेहतांना ‘आर या पार’ चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून सुरुवात केली होती. पण, चित्रपट नायकाच्या पठडीतले होते. दुसरीकडे समांतर चित्रपटांना जागाच ठेवली नव्हती. यात माझ्या विचारांनुसार कुठलेच चित्रपट निर्मात्यांच्या पचनी पडणारे नव्हते. ही कोंडी गेल्या काही वर्षांत बदलली आहे ती प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरूचीमुळे. त्यांनी आशयात्मक चित्रपटांना प्रतिसाद दिला, चित्रपटाच्या यशाने निर्मात्यांना विश्वास दिला आणि निर्मात्यांनी आमच्यासारख्या दिग्दर्शकांवर विश्वास टाक ला. हे जे चक्र होतं ते आता कुठे सुरळीत झालं आहे आणि त्याचं श्रेय हे प्रेक्षकांनाच दिलं पाहिजे.
तुझ्यासारख्या दिग्दर्शिकेला ‘यशराज’ बॅनरचा पाठिंबा मिळणं किती महत्वाचं वाटतं?
दहा वर्ष मी चांगला चित्रपट बनवण्यासाठी वाट पाहिली आहे. मला दिग्दर्शिका व्हायचंय म्हणून कुठल्याही चित्रपटाला होकार देणं माझ्या तत्वात बसत नव्हतं. अशावेळी यशराज बॅनरने एका चांगल्या कथेला न्याय दिला एवढंच नाही तर दिग्दर्शक म्हणून मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. माझ्यावर असेच कलाकार घेतले पाहिजेत, चित्रपटात गाणीच हवी.. असं कुठल्याच प्रकारचं बंधन नव्हतं. एका उत्तम कलाकृतीसाठी तुमच्यावरचा विश्वास आणि तुमच्या सर्जनशीलतेला वाव देणं, त्याचा आदर करणं या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आज इंडस्ट्रीत या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच आशयाच्या, अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या, संगीताच्या सगळ्याच स्तरांवर चित्रपट बदलला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2014 रोजी प्रकाशित
यशराजचा चित्रपट मिळणे सोपी गोष्ट नव्हती – नुपूर अस्थाना
इंडस्ट्रीची काहीही माहिती नसताना तिथे आपला शिरकाव करून घेणं फारच अवघड किंबहुना अशक्य मानलं जातं.

First published on: 16-03-2014 at 12:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bewakoofiyaan more than just a love story says director nupur asthana