‘फिर तेरी कहानी याद आई’ आणि मग ज्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो ‘जख्म’ हा १९९९ साली आलेला चित्रपट हे महेश भट्ट यांच्या आयुष्यावर बेतलेले होते. चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रात तितकाच सहजसंचार असणाऱ्या महेश भट्ट यांनी चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपली हॅट कधीच उतरवली आहे. त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा खजिना पाहता त्यांच्या दर नव्या चित्रपट-मालिकेमागे भट्टसाहेबांच्या आयुष्यावर कथा असणार असा एक सूर निघतो. जो आता त्यांनी लिहिलेल्या ‘नामकरण’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा आळवला गेला आहे. मात्र जे सत्य तुम्हाला पुरते उघडे करते ते चित्रपटातून मांडणं खूप अवघड आहे. आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यातून झालेली वैचारिक घडण ही लोकांना पचणारी नाही आणि मग अर्धसत्याचा आधार घेत आपलं आत्मचरित्र रंगवणं पसंत नसल्याने आयुष्यात कधीही आत्मचरित्रपट करणार नाही, असे महेश भट्ट निक्षून सांगतात.
मध्यंतरी त्यांची मोठी मुलगी पूजा भट्ट त्यांच्यावर चरित्रपट करणार असल्याची चर्चा होती. पूजा त्यासाठी आपल्या मागे लागली होती, हे ते मान्य करतात. मी तिला खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिचा हट्ट सुरू होता. त्यामुळे तिने जर माझ्यावर काही लघुपट तयार केला तर तो तिच्या म्हणजे माझ्या मुलीच्या नजरेतून माझ्याविषयी सांगणारा चित्रपट असेल, पण त्याला माझा चरित्रपट म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही भट्ट यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत चित्रपटापेक्षाही टेलिव्हिजनचं माध्यम जास्त प्रभावी ठरलं आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे एकापाठोपाठ एक कथा त्यांनी टेलिव्हिजनसाठी लिहिल्या. ‘उडान’, ‘दिल की बाते दिल ही जाने’ या मालिकांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. आता ते पुन्हा एकदा ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर ‘नामकरण’ ही मालिका घेऊन येत आहेत. ‘नामकरण’ची कथा महेश भट्ट यांनी लिहिली आहे. स्त्री हा त्यांच्यासाठी चिरंतन विचाराचा विषय असल्याकारणाने त्यांच्या मालिकांचे विषयही स्त्रियांचे स्वातंत्र्य, त्यांचा वैचारिक-शारीरिक झगडा याभोवती फिरणारे असतात. ‘नामकरण’मधून खूप वर्षांनी आजच्या स्त्रीमध्ये असलेली वैचारिक बंडखोरी प्रकर्षांने समोर येईल, असं त्यांनी सांगितलं. स्त्रियांचे अस्तित्व त्यांच्या नावापासून धरले तर एक तर ते वडिलांच्या नावाशी जोडले जाते नाही तर विवाहानंतर पतीच्या नावाशी जोडले जाते. आत्ताच्या काळातही आपले नाव काय लावावे, हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना आहे का? इथूनच ही मालिका सुरू होते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने स्त्रियांना त्यांना हवे तसे नाव लावण्याविषयीची कायदेशीर तरतूद केलेली आहे. पण अनेक ठिकाणी अजूनही एवढे साधे स्वातंत्र्य त्यांना दिले जात नाही या मूळ विचारापासून ‘नामकरण’ची कथा लिहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हा महेश भट्ट यांच्या लिखाणाचा मुख्य विषय राहिला आहे, मग समोर माध्यम मालिकेचे असो किंवा चित्रपटाचे.. असं म्हटल्याक्षणी आपल्या आयुष्यावर लहानपणापासूनच स्त्रियांचा पगडा राहिला आहे तो आजपर्यंत असं ते गमतीने सांगतात. मला माझ्या आईने एकटीने वाढवलं, एकेरी पालकत्वातून मी मोठा झालो आणि तसे का झाले? हे मी कधी लपवलेले नाही. ‘जख्म’मधून तो विषय सविस्तरपणे मी मांडला आहे. त्यामुळे माझ्यावर आईचाच जास्त पगडा राहिला आहे. त्यानंतर पत्नी आणि आता माझ्या मुली.. त्या मिळून सगळ्याजणी मला सांभाळतात, कधी ऐकवतात-कधी ऐकतात आणि खरं सांगतो बायका जात्याच हुश्शार असतात त्यामुळे त्यांचं ऐकल्याने फायदाच होतो, असा सल्लाही देऊन टाकतात. सध्या त्यांचा ताबा मुली पूजा, अलिया आणि शाहीन यांच्याकडे आहे. ‘मी माझ्या मुलींचं का ऐकू नये? मलाही जे मिळवता आलं नसतं ते यश माझ्या मुलींनी अगदी लहान वयात मिळवलं आहे. त्यांचे विचार ऐकले की मला थक्क व्हायला होतं. सध्या माझ्या मुलीच माझ्या रिंगमास्टर आहेत,’ असं महेश भट्ट म्हणतात. महेश भट्ट यांनी दिग्दर्शनाचे शिवधनुष्यच उतरवून ठेवले आहे, मात्र अजूनही ते बॉलीवूडवर सध्या गारूड करून असलेल्या आपल्या मुलीसाठी अलियासाठी एखादा चित्रपट करतील, अशी अंधूक आशा व्यक्त होताना दिसते. ते मात्र या प्रश्नाचे उत्तर टाळतात. अलिया फार पुढे आहे, तिच्यासाठी दिग्दर्शन शक्यच नाही. आता मी अलियाला नाही तर अवनीला घडवतो आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘नामकरण’ या मालिकेच्या निमित्ताने आर्शिन नामदार या दहा वर्षांच्या मुलीला खास महेश भट्ट यांच्याकडून मार्गदर्शन मिळते आहे. आर्शिनने मालिकेत अवनी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे आणि एवढय़ा लहान वयात अत्यंत समजूतदारपणे अवनीची व्यक्तिरेखा साकारण्यावर आर्शिनवर सध्या आपण मेहनत घेत असल्याचेही महेश भट्ट यांनी स्पष्ट केले. ‘नामकरण’ ही मालिका ‘स्टार प्लस’वरची आजपर्यंतची लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’च्या जागी येते आहे. त्यामुळे त्या स्लॉटला साजेसा, तितकाच अर्थपूर्ण विषय आपल्या ‘अर्थ’ या चित्रपटानंतर पहिल्यांदाच हाताळला आहे, असेही महेश भट्ट यांनी सांगितले.