‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राजस्थानमध्ये गेलं असताना सलमान खानने दोन काळवीटांचा शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने त्याला गुरुवारी दोषी ठरवलं. या निर्णयासोबतच सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. सलमान खान वगळता घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि अभिनेता सैफ अली खान यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच सलमानची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जिथे सलमान कैदी क्रमांक १०६ म्हणून दाखल झाला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कारागृहात ही त्याची पहिली रात्र होती. तेथे बराक क्रमांक दोनच्या सेल क्रमांक दोनमध्ये सलमानची रवानगी करण्यात आली होती. जिथे त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात आली. दरम्यान, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आरामदायी आयुष्य जगणाऱ्या सलमानची कारागृहातील रात्र नेमकी कशी होती, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. बऱ्याच वेबसाइट्से प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानला आसाराम बापूच्या शेजारील बराकीमध्ये ठेवण्यात आले.
वाचा : सलमानला गजाआड पाठणाऱ्या बिष्णोई समाजाबद्दल तुम्हाला माहित आहे का?
आज सकाळी साडेदहा वाजता जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आज निर्णय न देता उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजची रात्रसुद्धा त्याला तेथेच, घोंगडीवर व्यतीत करायची आहे. मुख्य म्हणजे आज सकाळी देण्यात आलेला चहा- नाश्ता खाण्यास सुद्धा सलमानने नकार दिला. या बराकीमध्ये सलमानला रात्रीच्या जेवणात चण्याची डाळ, कोबीची भाजी आणि दोन चपात्या देण्यात आल्या होत्या. पण, त्याने ते खाण्यास नकार दिला. झोपण्यासाठी म्हणून त्याला चार घोंगडीही देण्यात आली होती. कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान रात्री कारागृहात जमीनीवरच झोपला होता. या साऱ्यामध्ये सुरुवातीचे काही क्षण सलमानचा रक्तदाब वाढला होता पण, कालांकराने त्याचा रक्तदाब सामान्य झाल्याचा अहवाल कारागृहातील डॉक्टरांनी दिल्याचं कळत आहे. आज सलमान त्याच्या कुटुंबियांना आणि वकिलांना भेटू शकतो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानला हॉटेलमधून मांसाहारी जेवण देणं शक्य होतं. पण, कारागृह प्रशासनाने त्याची परवानगी नाकारत त्याला जेलमधील जेवण देण्यात आल्याचं स्पष्ट केलं.