सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार होणं ही बाब आता नवी राहिली नाहीये. मुळात हा एक ट्रेंडच झाला आहे असंच म्हणावं लागेल. सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्यांमध्ये कलाकारांचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या विविध माध्यमांच्या सहाय्याने कलाकारमंडळी नेहमीच काही महत्त्वाच्या प्रसंगांना अनुसरून एखादी पोस्ट करतात. पण, बऱ्याचदा त्यांना या पोस्टमुळे ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागतं हे नाकारता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर नेटकऱ्यांनी धारेवर धरलं होतं. ज्यामागोमाग आता अभिनेता अभिषेक बच्चनवरही एका ट्विटर युजरने आक्षेपार्ह कमेंट केली आहे. बॉबी देओल अशा नावाच्या एका फेक अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये अभिषेक आणि क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी यांची तुलना करण्यात आली आहे. ज्यामध्ये या दोघांनाही त्या युजरने ‘युजलेस’ म्हटलं आहे. ”स्टुअर्ट बिन्नी म्हणजे अभिषेक बच्चनचं प्रतिबिंबच जणू. दोघांनाही इतक्या सुंदर जोडीदार (पत्नी) भेटल्या आहेत. हे दोघंही आपल्या वडिलांमुळेच चित्रपट आणि क्रिकेटविश्वात आले आहेत. मुळात काय, तर दोघंही ‘यूजलेस’ आहेत”, असं या ट्विटमध्ये म्हटलं गेलं होतं.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

सहसा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभिषेकने या युजरला मात्र सौम्य आणि तितक्याच बोचऱ्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. ‘माझ्या भूमिकेत काही अंतर चालून दाखव मित्रा… निदान दहा पावलं जरी तू चाललास तरीही ते कौतुकास्पद असेल. तुझे ट्विट पाहून तरी मला नाही वाटत की तू आयुष्यात फार पुढे जाऊ शकशील. स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याकडे लक्ष दे, इतरांची काळजी करु नकोस’, असं अभिषेकने ट्विट केलं. त्याचं हे ट्विट पाहून ट्रोल करणाऱ्या युजरने लगेचच आपली चुक झाल्याचं म्हणत आणखी एक ट्विट केलं. या दोघांमध्ये झालेल्या या ‘टिवटिवी’नंतर काही नेटकऱ्यांनी अभिषेकच्या बाजूने ट्विट करत त्याची साथ दिल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor abhishek bachchan says get well soon to a troll calling him useless twitterati cheer for him
First published on: 25-05-2018 at 11:32 IST