अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. स्टार स्पोर्स्ट्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या ट्रेलरला अनेकांनी सोशल मीडियावरही शेअर केलं. पण, एका चाहत्याला मात्र अक्षयच्या या ट्रेलरने एका वेगळ्याच मार्गाने प्रेरित केलं आहे. अक्कीच्या एका चाहत्याने त्याच्या मित्राला शौचालयाचं महत्त्वं सांगत ते बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यासोबतच त्याने इतरांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केलं आहे.
खिलाडी कुमारला जेव्हा या सर्व गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्याने ट्विट करत आपल्या चाहत्याची प्रशंसा केली. तुमच्यासारखे चाहते असणं ही खरच अभिमानास्पद बाब आहे, असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अक्षयच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केली. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार केल्यामुळे मोदींनी त्याचे आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांनी या ट्रेलरची प्रशंसा करताना ट्विट करत म्हटलंय की, ‘स्वच्छतेचा संदेश देण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. स्वच्छ भारतासाठी १२५ कोटी जनतेने हाच संदेश पुढे नेला पाहिजे.’ अक्षय कुमारने मोदींचं हे ट्विट रिट्विट करत म्हटलं, ‘खूप आभार सर, लोकांची मानसिकता यामुळे बदलेल आणि नवीन बदल होईल ही आशा आहे.’
या चित्रपटात अक्षयसोबत झळकणाऱ्या भूमी पेडणेकरनेही यासंबंधीचं एक ट्विट केलं. मोदींना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत तिने, ‘या अभियानाचा एक भाग असणं आमच्यासाठी फार गौरवास्पद आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभारी आहोत’, असं म्हटलंय.
THIS! Can’t applaud or praise you enough. Stupendous work! Proud to have fans like you. Love and prayers