अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या आजाराने ग्रस्त असून तो परदेशात या आजाराच्या उपचारासाठी गेला आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या आजाराचे निदान झाल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा प्रार्थना केल्याचं पाहायला मिळालं. आजारामुळे ग्रासलेला असला तरीही इरफान सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडला गेला आहे.

नुकतंच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. स्वत:च्या सावलीचा एक फोटो पोस्ट करत इरफानने यात कॅप्शन म्हणून रेनर मारिया रिल्का यांची एक कविता लिहिली आहे. अतिशय गर्भितार्थ दडलेली ही कविता वाचता आयुष्याकडे इरफान सकारात्मक दृष्टीनेच पाहत असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टमधील ‘लोकेशन’ पाहता इरफान नेमका कुठे आहे याचा अंदाजही अनेकांनीच लावला आहे.

https://www.instagram.com/p/BghKcfdn3K3/

वाचा : या पद्धतीने इरफान खानच्या ट्युमरवर उपचार होऊ शकतो

सध्या तो लंडनला असून, तिथेच एका प्रसिद्ध रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाअंतर्गत त्याच्यावर उपचार होणार आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता कधी एकदा पूर्णपणे बरा होऊन भारतात येतो, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात इरफानच्या प्रकृतीविषयी बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी सुरुवातीला त्याने केलेल्या ट्विटपासून ते आता शेअर केलेल्या कवितेपर्यंत, प्रत्येक पोस्टच्या माध्यमातून तो बऱ्याच गोष्टींचा उलगडा करत असल्याचं स्पष्ट होत आहे.