अभिनय क्षेत्रात जम बसल्यानंतर बऱ्याच कलाकारांनी त्यांता मोर्चा चित्रपट निर्मितीकडे वळवला आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. खिलाडी कुमार म्हणून नावाजलेल्या या अभिनेत्याने आतापर्यंत ‘रुस्तम’, ‘सिंग इज किंग’, ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटांच्या निर्मितीत हातभार लावला आहे. पण, चित्रपट निर्मितीकडे वळण्यामागेसुद्धा एक कारण होते, ज्याचा खुलासा खुद्द अक्षयनेच एका मुलाखतीत केला.

आपल्या कामाची काय किंमत मागावी हाच मोठा प्रश्न उदभवत असल्याने निर्मिती क्षेत्राकडे वळण्याता निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘आपल्या कामाची काय किंमत सांगायची हा माझ्यासमोर येणारा महत्त्वाचा प्रश्न. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून मी चित्रपटांची निर्मिती करतो, त्यात काम करण्यासाठी मी पैसे घेत नाही. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या नफ्यातील ठराविक रक्कम माझ्या वाट्याला येते.’ अभिनयाकडून निर्मितीकडे वळलेला एक निर्माता म्हणून आपल्याला होणारे फायदेही त्याने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

याविषयीच पुढे सांगत तो म्हणाला, ‘असे केल्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याचा प्रश्नच उभा राहात नाही. चित्रपट निर्माता होण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही कधीच इतर निर्मात्यांसमोर तुमच्या कामाची किंमत उघड करत नाही.’ आपल्या चित्रपटांच्या निवडी बाबतीत नेहमीच सजग असणाऱ्या खिलाडी कुमारने सध्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही चांगलाच तग धरला असून, त्याच्या यशामध्ये या अनोख्या मंत्राचे महत्त्वाचे योगदान असल्याचे नाकारता येणार नाही. खिलाडी कुमार प्रमाणेच त्याची पत्नी अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्नासुद्धा निर्मिती क्षेत्रात सक्रिय झाली असून, आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल करत आहे. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत आहे, तर अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.