हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर शाहरुख खानला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे, किंग खान हॉलिवूडमध्ये झळकणार कधी..? याचे उत्तर आता जवळपास मिळाले असल्याचे म्हणावे लागेल. शाहरुख खान आणि ‘रश अवर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ब्रेट रॅटनर या दोघांचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने ब्रेटला चक्क ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर थिरकायला भाग पाडले. त्यासोबतच शाहरुखने रॅटनरच्या ‘रश अवर’ (Rush Hour) या चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.
६०व्या सॅनफ्रॅन्सिस्को चित्रपट महोत्सवामध्ये शाहरुखला विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यादरम्यानच ब्रेट आणि शाहरुखमध्ये त्यांच्या कारकीर्दीविषयीसुद्धा प्रदीर्घ चर्चा झाली. याच मजेशीर क्षणातील एक व्हिडिओ ब्रेटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. ज्या व्हिडिओमध्ये किंग खान आणि ब्रेट ‘लुंगी डान्स’ करताना दिसत आहेत. दरम्यान, शाहरुखने गप्पांच्या ओघात ‘रश अवर’ मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली खरी. त्यामुळे त्याची ही इच्छा आता कोणा निर्माता-दिग्दर्शकापर्यंत पोहोचली आहे की नाही हे येत्या काळात कळेलच. कारण फक्त शाहरुखनेच नव्हे, तर खुद्द ब्रेटनेही त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. शाहरुखसह भारतात ‘रश अवर’चे (Rush Hour) चित्रीकरण करावे अशी इच्छा ब्रेटने व्यक्त केली. ब्रेट आणि शाहरुख या दोघांचीही एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण होणार का याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.
Thx @BrettRatner for a great evening at the @SFFILM ur doll is awesome like u. pic.twitter.com/eJNTInUHBx
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 15, 2017
कोणा एका हॉलिवूड कलाकाराने शाहरुखची प्रशंसा करत त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी ह्यू जॅकमननेही शाहरुख ‘वूल्वरिन’ची भूमिका चांगली निभावू शकतो असे म्हटले होते. एकंदर हे सर्व वातावरण पाहता किंग खानही येत्या काळात हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला तर त्यात नवल काहीच नाही.