‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने ‘क्वांटिको’ या सीरिजमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर जात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण, तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाला म्हणजेच ‘बेवॉच’ चित्रपटाला मात्र फारसा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाहीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘बेवॉच’चे ट्रेलर पाहता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘देसी गर्ल’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने फक्त ३.५ कोटींचाच गल्ला जमवला आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसची आकडेवारी पाहता शनिवारी या चित्रपटाने १.७ कोटींची कमाई केली. ‘बेवॉच’ प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याचजणांनी त्याबद्दल नकारात्मक सूर आळवला होता. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांवर काही छाप पाडू शकला नाही हेच स्पष्ट होतंय. पहिल्या आठवड्यातच ‘क्वांटिको गर्ल’च्या या हॉलिवूडपटाने नांगी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाचा गल्ला ५ कोटींचा आकडा पार करणार की नाही याबद्दलही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

‘बेवॉच’ प्रदर्शित झाल्यानंतर रविवारी पार पडलेल्या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळेही या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं. अनेकांना तर हा चित्रपट प्रदर्शित कधी झाला हेसुद्धा ठाऊक नसल्याची उदाहरणंसुद्धा पाहायला मिळत आहेत.

वाचा: प्रियांका चोप्रा कट्टर भारतीय, प्रश्नोत्तरावेळी दिलेली उत्तरं तर पाहा…

दीपिका पदुकोणच्या ‘ट्रिपल एक्स..’ च्या तुलनेत ‘बेवॉच’च्या प्रसिद्धीसाठी भारतात फारशी पावलं उचलली गेली नव्हती, त्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. ड्वेन जॉन्सनच्या चित्रपट कारकिर्दीतील सुरुवातीच्याच दिवसांमध्ये तोंडघशी पडणारा ‘बेवॉच’ हा पहिलाच चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये प्रियांकाच्या मादक अदा आणि ‘बेवॉच’ची स्टारकास्ट किमान नफा तरी कमवणार का, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.