दिवसेंदिवस करोनाचा संसर्क होणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाचली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी देशवासियांशी संवाद साधत, करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार २२ मार्च म्हणजेच रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांनी स्वतःला घरात कैद करत जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. अशातच घरातून बाहेर पडलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठिचार्ज केल्याचा व्हिडीओ एका अभिनेत्रीने शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जनता कर्फ्यू असतानाही घरातून बाहेर पडलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी पोलिसांचे कौतुक करत आहेत. पूजा बेदीने हा व्हिडीओ शेअर करत ‘मला असे वाटते राज्यात जनता कर्फ्यू स्ट्रीकली पाळला जातोय’ असे कॅप्शन दिले आहे.

यापूर्वी पूजाने जनता कर्फ्यूची खिल्ली उडवली होती. तिने ट्विटमध्ये “भारताने घरात बसून ताटं वाजवण्यापेक्षा करोनाशी सामना कसा करावा? याबाबत विचार करायला हवा. तसेच होणारी आर्थिक हानी भरुन काढण्यासाठी पुरेशी तयारी करायला हवी. निर्मला सितारामन यांनी एक चांगली योजना घेऊन देशवासीयांसमोर यावं. इतर देश करोनाशी लढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहेत. मग भारत का नाही?” असे म्हटले होते. या ट्विटच्या माध्यमातून तिने केंद्र सरकारने करोना व्हायरसशी लढण्यासाठी केलेल्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले होते.