अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या हा खिलाडी कुमार ‘पॅडमॅन’ या चित्रपटात व्यग्र असून त्याची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाची निर्मिती करत आहे. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून खिलाडी कुमार एक असामान्य कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर या चित्रपटातील दोन नवे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्यासोबत दिसत आहे.

‘…म्हणऊन तो पॅडमॅन झाला’, असे कॅप्शन देत त्याने राधिका आपटेसोबतचा फोटो पोस्ट केला. तर, ‘पॅडमॅन होण्यामागे या व्यक्तीने त्याला ताकद दिली’, असे कॅप्शन देत त्याने सोनम कपूरसोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने पोस्ट केलेल्या या दोन्ही फोटोंमधील एक फोटो कृष्णधवल रंगात असून, दुसरा एक फोटो हल्लीच्या दिवसांचा असल्याचे पाहताच क्षणी लक्षात येत आहे.

‘धडक’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

हे दोन्ही फोटो पोस्ट करत अक्षयने आणखी एक आनंदाची बातमी जाहीर केली. जागतिक पातळीवर जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी ‘सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेंट’ हा हॉलिवूड स्टुडिओसुद्धा आता ‘पॅडमॅन’च्या वितरकांच्या यादीत जोडला गेला आहे. त्यामुळे अक्षयचा हा चित्रपट खऱ्या अर्थाने अनेकांचे लक्ष वेधत आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगानंथम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटातून अक्षय एक वेगळीच क्रांती घडवून आणणाऱ्या अरुणाचलम यांची भूमिका साकारत आहे.