बॉलीवूडची अभिनेत्री अदिती राव हैदरीने सिद्धार्थशी लग्न केलंय, अशा चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. पण, अदितीने स्वतःच एक फोटो शेअर करत त्यांचं लग्न नाही तर साखरपुडा झालाय हे सांगितलं. अदिती व सिद्धार्थ यांनी बुधवारी (२७ मार्च रोजी) तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला. ‘तो हो म्हणाला,’ असं कॅप्शन देत अदितीने साखरपुड्याची गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली.

आज (१७ जानेवरी) अदितीच्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. या खास दिवशी अदितीने आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचे ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट रोमॅंटिक फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजला कॅप्शन देत अदितीने लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खूप सारं हास्य, आयुष्यभर आनंद. तू करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुला खूप बळ येऊ दे. तुझ्या आयुष्यभराच्या चीअरलीडरकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम.”

हेही वाचा… गर्भवती असूनही दीपिका पदुकोण करतेय ‘सिंघम अगेन’चं शूटींग, चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल

अदितीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत. एका मुलाखतीत अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाबद्दल विचारलं असता सिद्धार्थ म्हणाला होता की, “अदितीने मला होकार देण्यासाठी किती वेळ घेतला वगैरे हे प्रश्न आता दूर राहिले. मी खूप दिवस विचार करत होतो की, ही मला होकार कळवेल का? की नाही सांगेल. पण, सुदैवाने ती हो म्हणाली. आता आम्ही लग्न केव्हा करणार याचा निर्णय कुटुंबातील वरिष्ठ लोक घेतील. त्यांचा निर्णय आम्हा दोघांसाठी महत्त्वाचा असेल. ही काही चित्रपटाच्या शूटिंगची तारीख नाही की, मी ठरवेन तसं होईल. मोठ्या लोकांमध्ये चर्चा झाल्यावर तेच निर्णय घेतील.”

दरम्यान, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं, तर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महासमुद्रम’ चित्रपटात दोघांनी एकत्रित काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसले. चंदिगडमध्ये पार पडलेल्या बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी एकत्र हजेरी लावली होती.