सोशल मीडियावरील ‘बॉयकॉट’ ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटांचं बरंच नुकसान झालं आहे. अजूनही या ट्रेंडमधून बॉलिवूड पूर्णपणे बाहेर पडलेलं नाही. आमीर खानच्या चित्रपटापासून सुरू झालेला हा बॉयकॉट ट्रेंड अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरही बंदी घालायची मागणी होताना दिसत आहे. या बॉयकॉटबद्दल बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी त्यांचं मत मांडलं आहे आणि त्यामुळे ते चांगलेच ट्रोलही झाले आहेत.

याबाबत आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही तिचं मत मांडलं आहे. मध्यंतरी स्वराने यावर टिप्पणी केली होती, पण आता स्वराने याविषयी उघडपणेच भाष्य केलं आहे. वादग्रस्त आणि राजकीय मुद्द्यावर बऱ्याचदा स्वरा व्यक्त होत असते त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार नुकतंच तिला एका मुलाखतीमध्ये बॉयकॉट कल्चरबद्दल विचारणा झाली. तेव्हा स्वराने त्यावर टीका करत ‘बॉयकॉट कल्चर’ हे देशासाठी किती हानिकारक आहे ते स्पष्ट केलं. स्वरा म्हणाली, “जेवढं तुम्ही स्वातंत्र्य कमी करून देशात भीतीचं वातावरण निर्माण कराल, त्याचा विपरीत परिणाम देशातील कला, साहित्य, मनोरंजन या क्षेत्रावर होणारच. अशा भीतीदायक वातावरणात एखाद्या कलेची निर्मिती होऊच शकत नाही.”

आणखी वाचा : बहुचर्चित ‘फोर मोर शॉट्स प्लीज’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; या दिवशी होणार प्रदर्शित

यावर बोलताना तिने कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दलही वक्तव्यं केलं. स्वरा म्हणाली, “गेल्या काही वर्षात प्रकाश झा, संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या दिग्गजांवर लोकांनी हल्ले केले. यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या मनात एक धडकी भरली आहे. तुम्ही एका अशा देशात राहता जिथे एका फेसबुक पोस्टमुळे तुम्हाला जेलमध्ये डांबण्यात येतं. हा प्रकार देशभरात सुरू आहे. त्यामुळे याचा फटका मनोरंजनसृष्टी आणि कलक्षेत्राला बसणार आहे.”

याबरोबरच चित्रपटांचे बदलते विषय, सामाजिक विषयांची हाताळणी, योग्य संदेश आणि टिपिकल मसाला चित्रपटांचे फ्लॉप होणे याबद्दलही स्वराने वक्तव्यं केलं. त्याबद्दल स्वरा म्हणते, “चित्रपटात एखादा संदेश असणं हे आवश्यक आहेच, पण त्याची मांडणी प्रॉपगंडा, अजेंडा, राजकीय हेतु, साध्य करण्यासाठी व्हायला नको. कला आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून ती कलाकृति सच्ची असायला हवी. याची काळजी घेतली तर नक्कीच एक उत्तम चित्रपट तयार होईल.” स्वरा नुकतीच ‘जहां चार यार’ या चित्रपटात झळकली. बॉक्स ऑफिसवर तिचा हा चित्रपट सपशेल आपटला आहे.