लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’ चित्रपटातील ‘देखा तेन्नू’ गाण्याच्या लाँचचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात जान्हवी आणि राजकुमार रावने हजेरी लावली होती. यादरम्यान राजकुमार आणि जान्हवीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीदरम्यान जान्हवीला तिच्या जोडीदाराच्या अपेक्षांबद्दल विचारण्यात आलं.

हेही वाचा… VIDEO: “वेडी, मंदिरात असे कपडे…”, देवदर्शनासाठी निघालेल्या अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. जान्हवीने तिच्या रिलेशनशिपबद्दलदेखील अनेकदा खुलेपणाने भाष्य केलं आहे.

जान्हवी शिखर पहारियाला अनेक वर्षांपासून डेट करतेय. या लाँचदरम्यान जेव्हा जान्हवीला “तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा जान्हवी म्हणाली, “अशी व्यक्ती जी माझ्या स्वप्नांना त्याचं स्वप्न समजेल. मला अशा व्यक्तीची गरज आहे, जी मला धैर्य देईल, मला प्रोत्साहन देईल, मला आनंद देईल, मला हसवेल आणि जेव्हा मी रडेन तेव्हा मला आधार देऊ शकेल, असा जोडीदार मला हवा आहे.”

यावर मुलाखतकाराने जान्हवीला शुभेच्छा दिल्या. तर जान्हवी म्हणाली, “असा जोडीदार मिळणं कठीण आहे का?” यावर मुलाखतकार म्हणाला, “तुम्हाला आधीच तुमचा आदर्श जोडीदार मिळाला आहे.” हे ऐकल्यावर जान्हवीने स्मितहास्य केलं.

हेही वाचा… इम्रान खान आणि लेखा वॉशिंग्टनच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला रोमँटिक फोटो

जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, जान्हवी आणि शिखर पहारिया अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवीने ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.

हेही वाचा… “माझं तुझ्यावर खूप प्रेम…”, अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी कपूरबरोबर या चित्रपटात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच जरीना वहाब, कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्यादेखील निर्णायक भूमिका यात आहेत.