बॉलीवूडमधील धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या अभिनयासह नृत्य कौशल्यामुळे चर्चेत आहे. १९९४ रोजी प्रदर्शित झालेला ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि सलमान खानची जोडी लोकप्रिय ठरली होती. यात अभिनेत्री विविध प्रकारच्या मॉडर्न आणि एथिनिक लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटातील गाणी आणि कथानकामुळे चित्रपट हिट झाला होता.

मोठ्या कुटुंबासह मित्रपरिवारासमवेत होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्याचा ट्रेंड त्याकाळी चित्रपटामुळे घराघरांत पोहोचला. चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांसह मराठमोळे कलाकारही होते. रेणुका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू, अलोक नाथ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे अशी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली होती.

हेही वाचा… स्विगीच्या बेशिस्त वाहनचालकावर अभिनेता रोनित रॉय संतापला; पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्हाला त्यांच्या जिवाची पर्वा…”

‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दीवाना’ हे गाणं तेव्हा खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यामधील माधुरी दीक्षितच्या जांभळ्या रंगाच्या साडीने आणि बॅकलेस ब्लाऊजने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. प्रसिद्ध डिझायनर अण्णा सिंग यांनी त्यावेळी ही साडी डिझाइन केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी तब्बल ₹१.५ दशलक्ष किंमतीची ही साडी केवळ फॅशन स्टेटमेंटच नव्हती, तर तिच्या अनोख्या बॅकलेस ब्लाउज आणि फूल स्लीव्हजसह त्याकाळी चर्चेचा विषय ठरली.

तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा माधुरीने ‘दीदी तेरा देवर दीवाना’ या गाण्यातील जांभळ्या साडीमधला लूक रिक्रिएट केला आहे. या लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘डान्स दिवाने’च्या रिॲलिटी शोसाठी माधुरीने या आउटफिटची निवड केली आहे. या शोमध्ये माधुरी परीक्षक म्हणून काम करते. या साडीवर माधुरीचा एक खास परफॉर्मन्स होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

माधुरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक आणि व्हाईटमध्ये याबाबतचा एक गिफ(GIF) शेअर केला आहे. यात बेचकीने मारणारा सीन माधुरीने रिक्रिएट केला आहे.

हेही वाचा… डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

दरम्यान, ‘डान्स दिवाने’ या शोबद्दल बोलताना माधुरी दीक्षित याआधी म्हणाली होती, “डान्स दिवानेसाठी परीक्षकाच्या आसनावर परतणे म्हणजे एका जपलेल्या परंपरेची पुनरावृत्ती केल्यासारखे वाटते.” माधुरीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती माधुरीने केली होती.