scorecardresearch

“पठाण चित्रपटाने भाजपाच्या नकारात्मक…” अखिलेश यादव यांचे ट्वीट चर्चेत

त्यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल होतानाही दिसत आहे.

Akhilesh Yadav Pathaan
अखिलेश यादव पठाण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील काही दृश्यावरुन वादही निर्माण झाला होता. पण आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पठाण चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याद्वारे त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्याने १२० कोटींची कमाई केली होती. सध्या संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नवनवे विक्रम रचताना दिसत आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येत असताना नुकतंच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केले आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले “अजित पवार, सुप्रिया सुळे…”

“पठाण चित्रपट सुपरहिट होणे हा देशातील आणि जगाच्या सकारात्मक विचारांचा विजय आहे. त्याबरोबरच भाजपच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने दिलेले चोख प्रत्युत्तर आहे”, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले आहे. अखिलेश यादव यांच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. त्याबरोबरच त्यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल होतानाही दिसत आहे.

दरम्यान पठाण हा चित्रपट गेल्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांवरुन बराच वाद झाला होता. अनेक हिंदू संघटनांनी या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप नोंदवला होता.

पण सध्या शाहरुख-दीपिकाच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने भारतात अवघ्या सहा दिवसात ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याबरोबरच या चित्रपटाने जगभरात ६ दिवसात ६०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 09:51 IST