अमिताभ बच्चन यांचा उत्साह आणि एनर्जी या गोष्टी जशा तरुण कलाकारांना लाजवणाऱ्या आहेत, तसाच एक आणखी बॉलिवूड अभिनेता आहे ज्याचा फिटनेस पाहून आजही लोक आश्चर्यचकित होतात. तो अभिनेता म्हणजे चिरतरुण अनिल कपूर. आजही हृतिक रोशनपासून रणवीर सिंगपर्यंत प्रत्येक कलाकाराबरोबर अनिल कपूर यांनी काम केलं आहे. नुकतंच अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिने त्यांच्या या फिटनेसच्यामागील सीक्रेटबद्दल खुलासा केला आहे.

डॉक्टर शिव के सरीन यांच्या ‘ओन युअर बॉडी : डॉक्टर्स लाईफ सेविंग टिप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान सोनम कपूर हिने बोनी, संजय आणि अनिल या तीनही भावांच्या जीवनशैलीबद्दल खुलासा केला आहे. सोनम म्हणाली, “माझे वडील हे फारच शिस्तप्रिय आहेत. ते धूम्रपान करत नाहीत, मद्यपान करत नाहीत, त्यांना कसलंही व्यसन नाही. बोनी कपूर यांना मात्र आयुष्य मस्तपैकी जगायला आवडतं, त्यांना खायला खूप आवडतं अन् कधीतरी मद्यपानदेखील करायला आवडतं. संजय काकासुद्धा अगदी तसाच आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सगळे तब्येत जपणारे अन् या वयातही सुंदर दिसणारे पुरुष आहेत.”

आणखी वाचा : विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया ३’मध्ये एंट्री; कार्तिक आर्यनने पोस्ट करत दिली माहिती

अनिल कपूर यांच्या या फिटनेस आणि कोणतंही व्यसन न जडण्याचं श्रेय सोनम हिने सर्वस्वी तिच्या आईला दिलं आहे. सोनम म्हणाली, “अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्या आईनेचे सर्वप्रथम मुंबईत पर्सनल ट्रेनिंगसाठी जीमची सुरुवात केली, त्यामुळे ती किती फिटनेस फ्रिक आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या वडिलांना कधी कधी व्यायामाचा कंटाळा येतो पण आई त्यावेळी त्यांना बरोबर चांगलं प्रोत्साहन देते. ती एक आदर्श भारतीय पत्नी आहे.”

‘जोया फॅक्टर’ या चित्रपटानंतर सोनम कपूरने मनोरंजन क्षेत्रापासून फारकत घेतली. त्यानंतर ती अनुराग कश्यपच्या ‘एके व. एके’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून झळकली. नंतर सोनमने २०२३ च्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटातून कमबॅक केला पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. अनिल कपूर नुकतेच हृतिक रोशन व दीपिका पदूकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटात झळकले. त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं.