बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच इमरान सलमान खान व कतरिना कैफच्या ‘टायगर ३’मध्ये झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात इमरानने प्रथमच सलमानबरोबर स्क्रीन शेअर केली. त्याने यात खलनायकाची भूमिका केली जी लोकांना चांगली पसंत पडली. इमरानचं लोकांनी खूप कौतुक केलं.

या चित्रपटानंतर इमरान आता फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन ३’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार याची चर्चा होऊ लागली. ‘डॉन ३’ची घोषणा नुकतीच फरहानने केली, त्यात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रणवीरच्या बरोबरीनेच तितकाच तगडा व्हिलन म्हणून इमरान हाश्मी या चित्रपटात दिसू शकतो अशी चर्चा सुरू होती. त्याला खुद्द इमरान हाश्मीनेच पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा : “निर्मात्यांनी याचा गैरफायदा…” सुरुवातीच्या काळातील ‘सिरियल किसर’ या प्रतिमेबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून आपण ‘डॉन ३’मध्ये काम करणार नसल्याचं इमरानने स्पष्ट केलं आहे. इंस्टा ग्राम स्टोरीमध्ये इमरानने स्पष्टपणे तो या चित्रपटाचा भाग कधीच नव्हता हे स्पष्ट केलं आहे. इमरान लिहितो, “काही चाहते आणि पत्रकार जे मला प्रश्न विचारत आहेत त्यांच्या माहितीसाठी मी ‘डॉन ३’चा भाग नाही, मला या चित्रपटाबद्दल कधीही विचारणाही झालेली नाही.”

फोटो : सोशल मीडिया

‘टायगर ३’मध्ये खलनायकाची भूमिका साकारल्याने आता ‘डॉन ३’मध्येही इमरानच व्हिलन असेल अशी अफवा त्याच्या चाहत्यांनीच पसरवली असल्याचंही स्पष्ट झालं आहे. ‘डॉन ३’मध्ये रणवीर सिंगबरोबर अभिनेत्री कियारा आडवाणीही झळकणार आहे. नुकतंच फरहानने याची घोषणा केली होती. तर इमरान आता ‘लवकरच ‘शोटाइम’ या आगामी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.