बलात्कारप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अभिनेता शायनी आहुजा याच्या याचिकेवरील कार्यवाही गतिमान करीत न्यायालयाने त्यावर ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्याचे निश्चित केले. याचिकेवरील सुनावणीला होत असलेल्या दिरंगाईमुळे वाढत असलेला मानसिक ताण आणि नव्याने जीवन सुरू करण्याच्या इच्छेमुळे शायनीने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून याचिकेवरील सुनावणी जलद करण्याची मागणी केली.
२००९ मध्ये मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्च २०११ मध्ये जलदगती सत्र न्यायालयाने शायनीला दोषी ठरवले होते. याप्रकरणी त्याला सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्याच्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित ठेवत त्याला जामीन मंजूर केला होता.
त्यावेळची परिस्थिती विचारात घेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात आले होते. त्यामुळे फेरविचार याचिकेवरही लवकरात लवकर सुनावणी झाली पाहिजे, अशी विनंती शायनीचे वकील अशोक मुंदरगी यांनी केली. न्या. साधना जाधव यांनी त्यांची विनंती मान्य कली असून, न्यायालय ऑगस्ट महिन्याच्या तिस-या अठवड्यात अपिलावरील सुनावणीस सुरूवात करणार आहे.
पोलिसांची तपासणी एकतर्फी आणि पक्षपाती असल्याचे शायनीने आपल्या अपिलात म्हटले असून, त्याची बाजू सिद्ध करणारे कॉल डाटा रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज हे पुरावे तपासण्याची गरज असल्याचे सुद्धा तपास अधिका-याना वाटले नसल्याचे शायनीचे म्हणणे आहे. कनिष्ठ न्यायालयानेसुद्धा तपास अधिका-यांना सीडीआर आणि सीसीटीव्हीशी संबंधित पुरावे सादर करण्याचे आदेश दिले नाहीत, ज्याच्यामुळे कोणताही बलात्कार झाला नसल्याचे सत्य जगासमोर आले असते.
वृद्ध आई-वडिल, पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी यांचे पालन-पोषण करायचे असून, अपिलावरील सुनावणीला होत असलेल्या विलंबाने आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असल्याचे शायनीने म्हटले आहे.