दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे सलमान खानचे चित्रपट तिकीटबारीवर नवनवे विक्रम करत असतात. या वर्षी सलमानने आपल्या चित्रपटांना विश्रांती दिली आणि हा ईदचा मुहूर्त शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला मिळाला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातून दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर जमवलेली जोडी शाहरूखला चांगलीच लाभदायक ठरली असून प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३३.१२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. सलमान खानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३२.९२ कोटी रूपयांची कमाई केली होती. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने हा विक्रम मोडला असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे.
‘चेन्नई एक्स्प्रेस’ने ‘पेड प्रीव्ह्यू’चा आत्तापर्यंतचा विक्रमही मोडला आहे. आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाला ‘पेड प्रीव्ह्यू’तून २.७ कोटी रूपये मिळाले होते. तर चेन्नई एक्स्प्रेसला ६.७५ कोटी रूपये मिळाले आहेत. दोन्हींची आकडेवारी एकत्र केली तर आत्तापर्यंत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने एकूण ३९.८७ कोटी रूपये मिळवले असल्याची माहिती तरण आदर्श यांनी ‘ट्विटर’वर दिली आहे. तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती ‘डिस्ने युटीव्ही’चे भारतातील वितरण संचालक गौरव वर्मा यांनी दिली आहे. तर देशभरातील सगळ्या पीव्हीआर चित्रपटगृहातून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हाऊसफुल्ल आहे. तिकीटाच्या दरात वाढ केलेली नसतानाही चित्रपट सगळीकडे उत्तम कमाई करत असल्याचे पीव्हीआर समूहाचे कार्यप्रमुख प्रखर जोशी यांनी म्हटले आहे.
‘एक था टायगर’चा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड चेन्नई एक्स्प्रेसने मोडला आहे. आता चित्रपट तीन दिवसांत किती कमाई करतो आणि सलमानबरोबर शाहरूखही शंभर कोटीचा आकडा पार करून २०० कोटी क्लबमध्ये शिरकाव करतो का?, यावर ट्रेड विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. सध्या चित्रपटातून सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत अजूनही आमिर खान प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर सलमान खान आणि तिसऱ्या क्रमांकावर शाहरूखचे नाव आहे. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये स्वार झालेला शाहरूख सलमानपेक्षा एक पायरी वर चढून आपली बॉलिवुडमधील बादशाही परत मिळवणार का?, यावर पुढची आर्थिक समीकरणे अवलंबून असणार आहेत.