कास्टिंग काऊच विथ अमेय निपुण

‘कास्टिंग काऊच विथ अमेय निपुण’च्या दुस-या सिझनला सुरुवात झाली आहे. अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या भन्नाट कल्पनेतून सुरु झालेल्या या वेबसिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने हजेरी लावली होती. त्यानंतर आता या सिझनचा दुसरा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ‘वाजले की बारा’ म्हणत आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही या एपिसोडची पाहुणी होती.

‘कास्टिंग काऊच विथ अमेय निपुण’च्या सेटवर येणा-या प्रत्येक अभिनेत्रीसोबत अमेय, निपुण काहीतरी खोडकरपणा करतातच. तशीच काहीशी या एपिसोडचीही सुरुवात झाली. अमृता खानविलकर ही विशेष करून तिच्या नृत्यासाठी ओळखली जाते. पण, नृत्य ही केवळ तिच्यातील एक भाग असून ती नृत्यापुरता मर्यादीत नसल्याचे तिने यावेळी निपुणला ठणकावून सांगितले. इतकेच नव्हे तर या दोघांनी मिळून ‘नच बलिये’तील अमृता आणि उपेन पटेलमध्ये झालेल्या वादावरही तिला बोलते केले. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘बाजी’ मारली, असे म्हणत अमेयने ‘बाजी’ म्हणजे चित्रपट नाही असा विनोदही केला. त्यावर ‘बाजी’ चित्रपटाविषयी काही बोलण्यापेक्षा अमृताने ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला प्राधान्य देत त्यावर चर्चा केली. विशेष म्हणजे, अमृताने चक्क निपुणलाच आयटम गर्ल बनवलं. निपुण नाचला नाही तर मी इथून निघून जाईन, असाच काहीसा हट्ट अमृताने यावेळी धरला होता. शेवटी आपल्या चित्रपटात अभिनेत्री हवी म्हणून निपुणही नाचायला तयार होतो. त्याने चक्क ‘सात समुंदर पार में तेरे पिछे पिछे आ गयी’ या गाण्यावर ठेका धरला. पण, अखेर अमेय आणि निपुणचा वेडेपणा पाहून अमृता तेथून निघून गेली. यावर निपुणलाही त्याचे रडू आवरले नाही.