हां.. सर, मी बोलतोय..
मिलिंद शिंदे..
हां.. हां.. बोला..
मी आलोय सर मुंबईला..
मग कधी येताय..? .. आज की उद्या..?
सर.. उद्या आलं तर चालेल..?
हो.. ऽऽऽ
हो.. बोलणारी व्यक्ती… साक्षात विजय तेंडुलकर होते..
त्यांनी माझा पहिला सिनेमा ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ पाहिला होता.. त्यानंतर अमृता सुभाष करवी त्यांचं आणि माझं संभाषण झालं होतं..
कौतुक करून, मुंबईला आलात की भेटा… बोलायचं आहे. असं तेंडुलकर मला म्हणाले होते.
तेव्हा मुंबईत माझा राहायचा ठिकाणा नव्हता.
काम असलं की आमदार निवास इतर वेळी घरी.
नगरला.. अहमदनगरला..
त्यांचा नगरच्या घरच्या नंबरवर फोन आला होता..
सर पत्ता..?
ते पत्ता सांगत होते.. मला त्यांचा पत्ता
शब्द परत परत विचारायची इतकी लाज वाटत होती की काय सांगू..
कसाबसा पोहोचलो..
त्या दिवशी मुंबईत कुठेतरी बॉम्बस्फोट झाले होते..
सर्वत्र बंदोबस्त..
मी घरी पोहोचलो तेंडुलकरांच्या…
त्यांच्या खोलीत गेलो…
तेंडुलकरांची खोली (रूम) अभ्यासिका.. काहीही पण तेंडुलकरांची..
माझ्यासारख्या नवकलावंतासाठी अदभूतच सगळं.
तेंडुलकर बरंच बोलत होते.. मनापासून..
माझ्या कामाबद्दल.. छान काम करता..
पडदा व्यापून टाकता.. तेंडुलकर हे बोलत होते आणि मी त्यांच्या डोळय़ांत हेच का ते घाशीराम कोतवाल, बाईंडर, गिधाडे, नियतीच्या बैलाला, सफर लिहिणारे माझे आवडते लेखक..!
मला जहिरा शेखवर नाटक लिहायचंय..
हे तेंडुलकर मला बोलल्याचं स्पष्ट आठवतंय.
तेंडुलकर.. जहिरा शेख.. तिस्ता सेटलवाड.. बरंच.. बोलत होते..
मी मात्र माझा आवडता लेखक माझ्याशी बोलतोय.. ज्यांची नाटकं पाहून-वाचून अख्खी रंगभूमी शिकू पाहतेय..
त्या माणसाच्या समक्ष मी बसलो होतो.. यातच हरवून गेलो होतो..
त्यांच्या डोळय़ांत पाहात.. त्यांना आणखीन काय काय म्हणायचंय ते वेचण्याच्या प्रतीक्षेत..
मी त्यांच्या डोळय़ांच्या आत आत डोकावू पाहतो..
मी आत.. पाहू पाहतो..
मला वाटतं,
व्यस्त तेंडुलकरांपेक्षा अव्यक्त तेंडुलकर
जास्त स्फोटक असावेत
अनोळखी नंबर.. मी फोन उचलला
नामदेव ढसाळ बोलतोय..
आऽऽऽ?
ढसाळ.. नामदेव ढसाळ बोलतोय.. मी..
‘झुलवा’चे काही प्रयोग वामन केंद्रे सरांनी दलित पँथरच्या कार्यक्रमासाठी लावले होते, जे करणं मला शक्य होत नव्हतं म्हणून मी अगदी अवघडून वामन केंद्रेंना नाही होणार हो सर
सांगितलं होतं..
ठीक आहे.. वामन केंद्रे..
त्यानंतरचा हा डायरेक्ट ढसाळांचाच फोन..
हा.. सर, बोला ना.. मी.
मिलिंदराव, प्रयोग करायचाय आपल्याला..
‘झुलवा’ आपल्या कार्यक्रमात झालं पाहिजे..
हो सर, पहिला करतो.. नंतर अवघड आहे… नाही नाही.. सगळे प्रयोग तुम्हीच करायचे
मिलिंदराव..
पण सर..
पहिल्या प्रयोगाला तर या.. मग बोलू..
मी ढसाळांना लपत-लपत(?) पहिला प्रयोग केला
प्रयोग संपल्यावर.. ढसाळांनी मला मारलेली
गच्च मिठी मला अजून आठवतेय..
त्यांच्या त्या भरदार छातीपर्यंत कसाबसा मी पोहोचत असावा..
आता मुद्दा.. काय..?.. ढसाळ
शूटिंग आहे सर..
कुणाचं..
गजेंद्र अहिरेचं..
नंबर काय त्याचा..?
मी तोंडपाठ नंबर सांगितला. त्यांनी
लगोलग फोन लावला. त्यांचं बोलणं मी ऐकत होतो.. तडजोडीनंतर तोडगा निघाला
असं वाटलं..
विमानानं पाठवू का त्याला पुण्याला..?
पलीकडून गजेंद्र ‘नाही’ म्हणाला असावा..
त्यानंतरचे तीन-चार प्रयोग मी करणार हे ठरलं..
ढसाळांनी मला पुणे-मुंबई ये-जा करण्यासाठी इनोवा दिली. त्या वेळी इनोवा गाडी अगदी नवीनच आली होती.. तर त्यांची मला खर्चायला म्हणून दोन हजार (हजार-हजारच्या नव्या कडक नोटा) रुपये दिले होते. वर टाकी फुल डिझेलची.
दोन-तीन दिवस मी ढसाळांनी दिलेल्या
गाडीतून पुणे-मुंबई ये-जा करत होतो.
प्रयोग होत होते.. शूटिंगही होत होतं..
एक झालं..
मी ढसाळांनी दिलेले दोन हजार रुपये
अजिबात खर्च नाही केले..
माझ्या वडिलांना सांगून मी त्यांच्या फ्लोरिडाच्या पत्त्यावर मनीऑर्डर केले.
मला माझ्या त्या वेळेसच्या वागण्याचं अतिशय वैषम्य वाटतं..
का पैसे परत पाठवले आपण..?
खर्च न करताही आपण जवळ ठेवू शकलो असतो..?
कसला प्रामाणिकपणा दाखवायला निघालो होतो
आपण.. काय सांगू पाहात होतो.. मी किती सच्चा ते..?
आज निदान ढसाळ साहेबांचे दोन हजार मी देणं लागतो हे तरी सांगता आलं असतं..?
तेंडुलकर काय, ढसाळ काय..
शब्दांच्या फटकाऱ्यातनं.. वेदना, परिवर्तन, विषमता, दाहकता यावर टोकदार व तीक्ष्ण लिहिणारे डोळय़ांत अंजन घालायचे
कधी खाडकन डोळे उघडायचे..
अर्थात दोघांची तुलना होऊ शकत नाही..
दोघंही शब्दांनी वार करणारे होते तरी वेगवेगळे होते..
गोलपीठाची तेंडुलकरांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली की दोन दिग्गजांची गळाभेट दिसते..
ता.क.
तेंडुलकर आणि ढसाळ यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान (दिला नाही) मिळाला नाही. उत्तम साहित्य निर्मितीत कमी पडले की काय?
– मिलिंद शिंदे
याआधीचे ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा
CELEBRITY BLOG: …म्हणूनच हा पत्रप्रपंच!
CELEBRITY BLOG: नवं वर्ष… नवा श्वास… नवा विश्वास!
CELEBRITY BLOG: नियम म्हंजे काय रे भाऊ?
CELEBRITY BLOG: हे इद्यापीट म्हणजे काय?
CELEBRITY BLOG: हे आणि ते…