सेलिब्रिटी क्रश : ‘तो सतत माझ्याकडे पाहतोय असचं वाटायचं’

दिसायला सुंदर, देखणा आणि विशेष करून तो उंच असल्यामुळे मला खूप आवडायचा.

'सरस्वती' म्हणजेच तितिक्षा तावडे ही अभिनेत्री सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय
आजच्या घडीला आपण  विविध मालिका सुरु झालेल्या पाहतोय. त्यातून नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही चेहरे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. पण मालिकेमध्ये प्रेमळ, आपल्या पतीवर निस्वार्थीपणाने प्रेम करणारी आणि स्वच्छंदपणे आयुष्य जगणाऱ्या ‘सरस्वती’ने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलेसे केले. ‘सरस्वती’ म्हणजेच तितिक्षा तावडे ही अभिनेत्री सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. टॉमबॉयसारखी पर्सनालिटी आणि सध्या ती साकारत असलेली भूमिका यांमध्ये तफावत असली तरीही ही अभिनेत्री प्रेमाच्या बाबतीत मात्र काहीशी सावधगिरीनेच पाऊल टाकायची. त्यामुळे सतत प्रेमात पडणा-या पण पुढे भीतीने काहीच पाऊल न उचलणा-या तितिक्षाने तिच्या क्रशबद्दल अगदी खुलून सांगितले.

माझं पहिलं क्रश मला सातवीत असताना झालं होतं. माझ्या वर्गात तो मुलगा होता. दिसायला सुंदर, देखणा आणि विशेष करून तो उंच असल्यामुळे मला खूप आवडायचा. मला उंच मुलं खूप आवडायची. त्यावेळी कलाकार उंच असायचे त्यामुळे उंच व्यक्ती हॅण्डसम असतात अशी काहीशी माझी तेव्हा धारणा होती. माझं सातवीतलं हे क्रश जवळपास अर्ध वर्ष चाललं. पण माझ्यात त्याला काही विचारण्याची हिंमत नव्हती. शाळेत असताना मी क्रिकेट खेळायचे. त्यामुळे माझा टॉमबॉयसारखा लूक असल्यामुळे मला सगळेजण मुलगाच समजायचे. तेव्हा माझा बॉयकट होता. क्रिकेट खेळून मी काळी झाले होते आणि जाड होते. त्यामुळे माझंही क्रश असू शकतं हे कुणालाच अपेक्षित असणार नाही. याच कारणामुळे मी फ्रेण्डसनाही त्याच्याबद्दल सांगितलं नाही. त्यांनी मला वेड्यात काढलं असतं. पण, मी गुपचूप त्याला पाहायचे. त्याला मी इतकं निरखून पाहायचे की शेवटी शेवटी त्यालाही ते कळलं होतं. त्याचवेळी मला असं वाटायचं की, तो ही माझ्याकडे बघतोय. पण मला खूप नंतर कळलं की तो माझ्याकडे नाहीतर माझ्या मागच्या मुलीकडे बघायचा. त्याचं लक्ष माझ्या मागे बसणा-या मुलीकडे असायचं. त्यानंतर मग मी अभ्यासात लक्ष देऊ लागले आणि फार काही झालं नाही.

टॅलेण्टेड व्यक्ती मला नेहमीच आवडतात. मी एकदा क्रिकेटच्या टूर्नामेण्टसाठी एकदा बाहेरगावी गेले होते. तिथे मुलांची टीमही होती. त्यात एक भारी क्रिकेट खेळणारा मुलगा होता. मला तो खूप आवडला आणि त्याचं पूर्ण नावही मला माहित नव्हतं. नंतर मी त्याचा चेहराही विसरून गेले. पण, माझं त्याच्यावर इतकं क्रश होतं की त्याने पुढे जाऊन भारतीय संघासाठी खेळावं अशी माझी इच्छा होती. त्याकाळात मी शाळेत असल्यामुळे माझ्याकडे फोन नव्हता. त्यामुळे मला त्याचा फोटोही काढता आला नाही आणि त्याचा फोन नंबरही माझ्याकडे नव्हता. तरीही पुढची दोन-तीन वर्ष तो कुठेतही आहे असं मला वाटायचं. नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी गोव्याला गेले. तिकडे तर मला अनेकदा क्रश झालं. सतत प्रेमात पडणा-या मुलींपैकी मी आहे. मी खूपदा प्रेमात पडते. पण नंतर भीतीने पुढाकार घेत नाही. प्रेमाची ही जी काही फेज असते ती मी पूर्णपणे एन्जॉय करते.

मला महत्त्वाकांक्षी आणि त्यांच्या करिअरविषयी पॅशनेट असणारी मुलं मला आवतात. खासकरून त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. तसेच, इतरांना आदराने वागवणारा आणि माझ्यावर खूप प्रेम करणारा व्यक्ती मला माझ्या आयुष्यात आलेला आवडेल.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Celebrity crush i had my first crush in seventh standard says saraswati fame titeeksha tawde