मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सेटवर असलेली दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाला आहे. चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिग्दर्शकाने खोट्या नोटांऐवजी खऱ्याखुऱ्या नोटांची मागणी केली. दृश्य अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक असलेली दिग्दर्शकाची मागणी निर्मात्याने पूर्ण करण्याचे ठरवले. इतक्या मोठ्या रक्कमेची ने-आण सुरक्षितपणे व्हावी, तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून निर्मात्याने एका रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंकेत दोन कोटींची रोख रक्कम भरून ही ट्रंक या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या एका विश्वासू स्पॉटबॉयच्या हवाली केली. बराच वेळ सेटवर ‘तो’ स्पॉटबॉय न पोहोचल्याने शोधाशोध सुरू झाली आणि अखेर ती रंगीबेरंगी पत्र्याची ट्रंक घेऊन स्पॉटबॉय फरार झाल्याचे समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : स्वप्निल जोशी दुसऱ्यांदा झाला बाबा

मिळालेल्या माहितीनुसार, पैसे घेऊन फरार झालेल्या स्पॉटबॉयचे नाव चरण चंद्रकांत मोरे असून ‘तो’ मूळचा चिपळूण तालुक्यातील आहे. चरण चंद्रकांत मोरे हा अत्यंत साधा-सरळ तसेच गरीब स्वभाव असलेला, नाकासमोर चालणारा मुलगा असल्याने प्रॉडक्शन मॅनेजरच्या सांगण्यावरून निर्मात्याकडे त्याला ‘ती’ ट्रंक आणण्यासाठी पाठवल्याचे समजते. इतके होऊनही निर्मात्याने अजूनही पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. या कृत्याबद्दल चित्रपटसृष्टीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Happy Birthday Dharmendra वाचा : रेल्वेत क्लर्क ते बॉलिवूडचे ‘अॅक्शन किंग’

व्हॉट्सॲपवरून चरणचे आणि ‘त्या’ ट्रंकेचे फोटो वायरल होताच, ‘ती’ ट्रंक घेऊन एकजण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फिरताना दिसल्याची माहिती मिळाल्याने त्या दिशेने काही माणसे चरणला शोधण्यासाठी निर्मात्याने पाठवली होती, परंतु पुढे काय झाले? हे अद्याप समजलेले नाही. खरंच, इतक्या मोठ्या रकमेच्या खऱ्या नोटांची गरज होती का? स्पॉटबॉयच्या हातात एवढी मोठी रक्कम कशी काय दिली? अशा अनेक चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहेत. भोळ्या भाबड्या सरळमार्गी चरणने असे का केले? आजवर कधीही कोणती तक्रार नसलेला चरण असा का वागला? या कारनाम्यामागे दुसऱ्या कुणाचा हात तर नाही ना? दोनशे रूपये खर्च करायची अक्कल नसलेला चरण इतकी मोठी रक्कम घेऊन काय करेल? कुठे जाईल? ती पेटी घेऊन तो परत येईल का? अशा अनेक प्रश्नांची घालमेल तुमच्या मनात सुरू झाली असेलच. तर ही उत्सुकता आणि घालमेल २२ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. कारण, या सर्व गोष्टींचा उलगडा २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या, युनीट प्रॉडक्शन निर्मित, श्याम माहेश्वरी दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ या मार्मिक विनोदी चित्रपटात होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charandas chor marathi movie releasing on 22 december
First published on: 08-12-2017 at 11:43 IST