पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे दरवर्षी ‘चित्रटच’ हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. यंदाचा महोत्सव बुधवार, २६ मार्च ते २८ मार्च असे तीन दिवस आयोजित करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण विषयांवरचे नवे मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये सर्व चित्रपटांचे खेळ होणार असून सर्वाना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
तीन दिवसांच्या या महोत्सवाचे उद्घाटन ‘दुनियादारी’फेम दिग्दर्शक संजय जाधव यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता केला जाणार असून ‘यलो’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक व छायालेखक महेश लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या ‘चित्रटच’ महोत्सवासाठी नवे नऊ ग्रामीण मराठी चित्रपट निवडण्यात आले आहेत. गेल्या काही काळात नव्या दमाचे दिग्दर्शक विशेषत: ग्रामीण विषयांवरील चित्रपट करीत आहेत. त्यांचे चित्रपट गाजलेही आहेत. हे चित्रपट पाहिले की राज्यातील ग्रामीण समस्यांची झलकच पाहायला मिळावी म्हणून नव्या दमाचे ग्रामीण चित्रपट ही संकल्पना ठरविण्यात आली, अशी माहिती पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९.३० वाजता ‘नारबाची वाडी’ या चित्रपटाने होणार आहे. तिन्ही दिवशी सकाळी ९.३०, दुपारी २.३० आणि सायंकाळी ६ वाजता असे तीन चित्रपटांचे खेळ होतील. प्रत्येक चित्रपट खेळाच्या आधी अमोल परचुरे चित्रपटाचे दिग्दर्शक व अन्य कलावंत यांच्याशी रसिकांच्या वतीने संवाद साधणार आहेत. या महोत्सवात दररोज संबंधित चित्रपटांतील कलावंत, दिग्दर्शक उपस्थित राहणार असून रसिकांना भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
 पहिल्या दिवशी ‘नारबाची वाडी’, ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ आणि ‘फँड्री’ हे चित्रपट तर दुसऱ्या दिवशी ‘तुह्य़ा धर्म कोणचा?’, ‘भाकरखाडी सात किलोमीटर’, ‘टपाल’ हे चित्रपट दाखविण्यात येतील. तर तिसऱ्या दिवशी ‘सामथ्र्य’, ‘सत ना गत’ हे चित्रपट दाखविण्यात येतील. महोत्सवाचा समारोप ‘७२ मैल एक प्रवास’ या चित्रपटाने होणार आहे. वीणा जामकर, मकरंद अनासपुरे, आदित्य सरपोतदार, उमेश नामजोशी, सतीश मन्वर, नागराज मंजुळे, लक्ष्मण उतेकर, आसावरी जोशी, चंद्रशेखर सांडवे, अरुण नलावडे आदी कलावंत, दिग्दर्शक महोत्सवाला उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधणर आहेत.