कॉलेज आठवणींचा कोलाज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– ऋतुजा बागवे, अभिनेत्री

मी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यलयात पदवी शिक्षण पूर्ण केलं.  महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजे एम.डी. कॉलेज या नावाने सर्वश्रुत आहे. कॉलेजचा पहिलाच दिवस ओरडा खाऊन साजरा केला. त्याचं झालं असं, मी सैनिक शाळेतून माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे मी आजही टॉमबॉय आहे. त्या वेळी मी बऱ्यापैकी मुलांसारखीच दिसायची. वावरायची. माझा त्या वेळी बॉयकट होता. कॉलेजमध्ये पहिलाच तास गणिताचा होता. आणि सरांनी माझ्याकडे बघून आरडाओरडा चालू केला. की हे अतिशय साधं कॉलेज आहे. इथे मुलामुलींना एकत्र बसलेलं चालणार नाही. वगैरे! मी जागची हलली पण नाही हे पाहून त्यांनी मला माझं नाव विचारलं. माझ्या आवाजावरूनसुद्धा मी मुलगी आहे याची खात्री त्यांना न पटल्याने त्यांनी मला ‘आर यू बॉय ऑर गर्ल’ असा प्रश्न विचारला. तेव्हापासून पुढचे कितीतरी दिवस मला माझे मित्र ‘आर यू बॉय ऑर गर्ल’ असं विचारून माझी खेचत होते.

एम. डी. कॉलेजने मला अभिनेत्री म्हणून घडवलं. अकरावीपासून टी. वाय.पर्यंत पाच वर्ष सलग मी या कॉलेजमधील नाटय़विश्वात रमले होते. आमच्या कॉलेजच्या नाटय़ विभागाचं नाव ‘नाटय़ांगण’ होतं. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खास नाटकासाठी दोन वर्षे मी या कॉलेजमध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला होता. मी लेक्चर आणि परीक्षेला काही बसले नाही. फक्त कॉलेजचं आयकार्ड हवं होतं. माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातसुद्धा मी प्रवेश घेतला होता. तिथल्या एकांकिका आणि नाटय़ विभाग मला भारावणारा होता. पण शेवटी या वास्तूनेच मला तिच्यापाशी खेचून घेतलं. मी सात वर्षांत एकूण २२ एकांकिका केल्या. नॉट फॉर सेल, समथिंग क्रिएटिव्ह, स्मशानातील गुलमोहर, गेट सेट गो, उभे आडवे धागे, श्री तशी सौ, दादर व्हाया गिरगाव, थरारली वीट, कुंकू टिकल टॅटू, आयसीयू, सायलेंट स्क्रीम, जिलेबी या आणि अशा अनेक एकांकिका आम्ही गाजवल्यात.

नाटय़ांगण माझ्यासाठी माझं दुसरं कुटुंबच! कारण मी यांच्यासोबत २४ तास सोबत असायचे. त्यामुळे एकत्र डबे खाणे, नाटय़ स्पर्धेच्या निकालाच्या वेळी दंगा करणं, हरलेल्या कॉलेजच्या मुलांना चिडवणं अशा अनेक गोष्टी माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.

खरेतर कॉलेजच्या वास्तूनेच मला धाकड बनवलं. माझ्यातली उत्तम अभिनेत्रीचे गुण जागे केले. एकदा आम्ही ‘नॉट फॉर सेल’ या एकांकिकेची तालीम करत होतो. ज्यात मी दिग्दर्शकाची भूमिका करत होते. स्पर्धेला केवळ तीन दिवस बाकी होते. त्यात एका भाईचं पात्र साकारणाऱ्या मुलाने नाटकातून काढता पाय घेतला. त्यामुळे आयत्या वेळी मी त्याच्या जागी उभी राहिले व नाटक स्पर्धेत उतरवलं. माझ्या या भाईच्या भूमिकेला मला माझ्या आयुष्यातला सर्वात पहिलावहिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आजही आयुष्यात वा कामात कितीही कठीण प्रसंग आले तरीही मी निधडय़ा छातीने उभी असते. ते शौर्य मला कॉलेजने दिलं.

कॉलेजमध्ये मी थिएटर करायचे. त्यामुळे मला शिक्षकांनीही खूप सांभाळून घेतलं. मी फक्त ‘प्रॅक्टिकल लेक्चर’ला बसायचे. गणिताचे तास तर मी कधी बसलीच नाही. एकदा तोंडी परीक्षेच्या दिवशी गणिताच्या जोगळेकर बाईंनी माझी चांगलीच शाळा घेतली. मला त्या लेक्चरला बसत नाही म्हणून खूप ओरडल्या. पण मला त्यांच्या विषयात लेक्चरला न बसता चांगले गुण होते, हे पाहून त्या जरा अचंबित झाल्या. त्यांनी माझी चौकशी सुरू केली. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी थेटर करते म्हणून तुमच्या लेक्चरला बसत नाही. तो दिवस तसाच गेला. काही दिवसांनी त्या माझं नाटक बघायला आल्या. नाटक संपल्यावर त्या मला खास भेटल्या. आणि म्हणाल्या, की यापुढे तुला अभ्यासात काहीही मदत लागली थेट माझ्याकडे यायचं. कोणत्याही मित्र-मैत्रिणीकडे नोट्स मागायच्या नाहीत. बिनधास्त पुढे जा. लेक्चरला नाही बसलीस तरी चालेल. बोलल्याप्रमाणे त्या शब्दाला जागल्या. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. तेव्हापासून ते आता अनन्यापर्यंतची सगळी नाटकं त्यांनी पाहिली आहेत. हे विशेष!

कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप खाबूगिरी केली आहे. आमच्या नाटय़ांगणचा चमू ८० जणांचा होता. त्यामुळे दर महिन्याला ३ वाढदिवस ठरलेले असायचे. वाढदिवस असलेला उत्सवमूर्ती सुरीने नीट केक कापायचा. आणि आम्ही बाकीचे त्याचा केक कापून झाला रे झाला की तो केक हातानेच कापून थोडासा वाढदिवस असणाऱ्याला भरवून बाकीचा आम्हीच खायचो. आम्ही पाच जण सोडले तर सहाव्याला तो केक मिळायचापण नाही. दत्त बोर्डिग आणि क्षीरसागर हॉटेलमध्ये कोंबडी वडे खायला आम्ही अधूनमधून जायचो. सोलकढी पैज लावून प्यायचो. नाटकाच्या तालमीच्या दरम्यान दहा मिनिटं ब्रेक मिळाला की आम्ही कॉलेजच्या गेटवर शेवपुरी, पाणीपुरी खायला जायचो. नरे पार्कात बटाटावडा, पॅटिस पाव खायला जायचो. कॉलेज कॅन्टीनमध्ये शेजवान राइसवर ताव मारायचो. स्पर्धेच्या दिवशी माझी आई सर्वासाठी ‘बटर चिकन’ बनवायची.

आजही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला किंवा नवीन प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी मी कॉलेजला जाते. वास्तूला नमस्कार करते, मग कामाला सुरुवात करते.

शब्दांकन :- मितेश जोशी

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College days of actress rutuja bagwe zws
First published on: 26-06-2019 at 03:08 IST