‘परभाषिक’ श्रेणीसाठी भारताकडून पाठवणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहर उमटवणारा मराठमोळा चित्रपट ‘कोर्ट’ आता ऑस्करच्या पहिल्या पायरीवर पोहोचला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘कोर्ट’ ‘सवरेत्कृष्ट परभाषिक चित्रपट’ या श्रेणीसाठी देशाचे प्रतिनिधित्व करेल. या श्रेणीसाठी देशातील ३० चित्रपटांत स्पर्धा होती. मात्र, अमोल पालेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘कोर्ट’ या चित्रपटाची निवड केली. पीके, बजरंगी भाईजान, हैदर, बाहुबली आदी चित्रपटही या स्पर्धेत होते.

अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या ‘कोर्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट, तर विवेक गोंबर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर भाष्य करणारा हा चित्रपट वास्तव घटनेपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेला आहे. परभाषिक चित्रपटांच्या श्रेणीत भारताला आतापर्यंत कधीही ऑस्कर पुरस्कार प्राप्त करता आलेला नाही. यापूर्वी आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ हा चित्रपट या श्रेणीतील पहिल्या पाच चित्रपटांपर्यंत पोहोचला होता, मात्र पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली. ‘मदर इंडिया’ व ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटांनीही पहिल्या पाचात स्थान मिळवले होते.

राहुल रवैल यांचा राजीनामा

दरम्यान, ऑस्कर निवड समिती सदस्य राहुल रवैल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचा संबंध ‘कोर्ट’च्या निवडीशी नसून समितीचे अध्यक्ष अमोल पालेकर यांच्या हेकेखोर वर्तनाशी असल्याचे रवैल यांनी स्पष्ट केले आहे.

 

‘कोर्ट’ चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा मला व विवेकला, आम्ही एवढी मोठी मजल मारू असे स्वप्नातही वाटले नव्हते. सुरुवातीपासूनच आम्ही जास्त अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. आता ऑस्करसाठी देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. सगळेच स्वप्नवत आहे.  – चैतन्य ताम्हाणे, ‘कोर्ट’चे दिग्दर्शक

 

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court goes to oscar
First published on: 24-09-2015 at 08:01 IST