दिग्दर्शक म्हणून झोया अख्तरच्या सिनेमांची यादी सध्या तरी तीनवरच संपते. पण जावेद अख्तरांच्या या लेकीने पहिल्या सिनेमापासून जाणकारांचं लक्ष वेधून घेतलंच, शिवाय तीन सिनेमांच्या जोरावर महत्त्वाच्या दिग्दर्शकांमध्येही स्थान मिळवलं आहे.

एखादी प्रसन्न सकाळ कशी असते.. झोपेतून उठल्यापासून गाणी गुणगुणणं सुरू असतं. मनाच्या अगदी आतून ताजेतवानेपण जाणवत असतं. बाहेर पक्ष्यांची मंजूळ किलबिल सुरू असते. थंडीचा कडाका नसतो की उन्हाचा ताप नसतो. वातावरणात एक प्रकारचा आल्हाददायकपणा भरून राहिलेला असतो. जगणं सुंदर असल्याची नेणिवेतूनच कुठूनतरी खोलवर जाणीव भरून आलेली असते.

हे सगळं वर्णन असंच्या असं लागू पडतं झोया अख्तरच्या ‘जिंदगी ना मिले दोबारा’ या सिनेमाला. बॉलीवूडच्या नेहमीच्या फॉम्र्यूल्यात राहूनसुद्धा नेहमीच्या पसा वसूल सिनेमांच्या कितीतरी पट पुढे जाणारा हा सिनेमा. दिग्दर्शक म्हणून झोया अख्तरचा हा जेमतेम दुसरा सिनेमा. पण त्याने तिला वयाच्या ४२-४३साव्या वर्षी, पसा, यश, पुरस्कार सगळं भरभरून दिलं. आणि प्रेक्षकांना दिली तरुणपणाची लखलखीत जाणीव. होय. कारण आयुष्य एकदाच मिळतं तेव्हा ते भरभरून जगू या असं तरुण मनांनाच वाटू शकतं. येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच मुक्तपणे भिडण्याची जाणीव या मनांनाच असू शकते.  खरं तर झोया जगते त्या उच्चवर्णीय समाजाचं जगणं, त्यांचे ताणेबाणे मांडणारा हा सिनेमा. पण जागतिकीकरणाच्या लाटेवर आरूढ होत आत्मविश्वासाने वावरणाऱ्या तरुण भारतीय मनांना तो आपलासा वाटला. कारण त्यांचं जगणं त्या सिनेमाने कवेत घेतलं होतं.

एकेकाळचे जवळचे पण आता काहीसे दुरावलेले तीन मित्र, त्यांच्यातल्या एकाच्या बॅचलरेट पार्टीसाठी स्पेनच्या टूरवर जातात. तिथे कार हायर करून स्वत:च ड्राइव्ह करत फिरतात. टोमॅटिनो फेस्टिव्हल, बुलक फाइट फेस्टिव्हलमध्ये भाग घेतात. बारमध्ये उगीचच कुणाची तरी थट्टा करून किरकोळ तुरुंगवासाला सामोरे जातात. सुंदर व्हिलांमध्ये राहतात. स्कूबा डायिव्हगपासून ते स्काय डायिव्हगपर्यंतचे वेगवेगळे अनुभव घेतात. हे सगळं केव्हा होऊ शकतं?  तुमच्याकडे पसा असतो आणि आत्मविश्वास असतो तेव्हा. जगाला या पद्धतीने सामोरं, जाण्याचा आत्मविश्वास आजच्या भारतीय तरुणांमध्ये आहे असं विधान करणारा हा महत्त्वाचा सिनेमा. झोयाने तो तितकाच ताकदीने मांडला. तेही हृतिक रोशन, नसिरुद्दीन शाह, अभय देओल, कतरिना कैफ, कल्की कोचलीन अशा सगळ्या स्टार्सना घेऊन. या सिनेमातले हे तीन मित्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यातल्या भावनिक गुंतागुंती, त्या त्यांनी एकमेकांच्या मदतीनं सोडवणं, आपापल्या व्यक्तिमत्त्वातल्या दोषांवर एकमेकांच्या मदतीनं मात करणं आणि जगण्याकडे पुन्हा चांगल्या पद्धतीनं वळणं हे पडद्यावर मांडणं तसं सोपं नव्हतंच. पण मांडणीच्या झोयाच्या कौशल्यामुळे या दुसऱ्या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

त्याआधीचा तिचा पहिला सिनेमा होता, ‘लक बाय चान्स’. या सिनेमाला बॉक्स ऑफिसचं यश नाही मिळालं, पण झोयाने आपल्या वैशिष्टय़पूर्ण मांडणीने जाणकारांचं लक्ष नक्कीच वेधून घेतलं होतं. ऋषी कपूर, फरहान अख्तर, कोंकणा सेन शर्मा यांना घेऊन काढलेला हा सिनेमा. त्याचे रिव्ह्य़ू चांगले यायला लागले तशी झोया खूश झाली, रिव्ह्य़ू चांगले म्हणजे सिनेमा चांगला चालला असा माझा गरसमज होता, असं ती प्रामाणिकपणे सांगते. माझ्या घरी सतत सिनेमा, त्याचा दर्जा, मांडणी, जागतिक सिनेमे, प्रादेशिक सिनेमे यावर बोलणं व्हायचं, पण सिनेमा चालणं म्हणजे काय, बॉक्स ऑफिस, व्यवसाय हे मला माहीतच नव्हतं, असं ती सांगते.

‘लक बाय चान्स’ हा सिनेमा म्हणून उत्तमच होता. बॉलीवूडच्या सिनेमात काम करायची इच्छा घेऊन येणारे, सुरुवातीला एक्स्ट्रा म्हणून काम करणारे, त्यातल्या एखाद्याचं नशीब फळफळतं, तेव्हा तो ज्यांच्या खांद्यावर पाय ठेवून वर चढलेला असतो, त्यांना कसा विसरून जातो, हा इथला न्याय कसा आहे हे सांगणारा हा सिनेमा. बॉलीवूडमधले आतमधले संबंध, ताणेबाणे, वेगवेगळ्या माणसांच्या गुंतागुंती, स्वप्नं पाहणारे एक्स्ट्रॉ हे सगळं झोयाने या सिनेमात मांडलं आहे. हे सगळं मांडण्यासाठी तुम्हाला बॉलीवूड आतमधून माहीत असायला हवं. झोया त्याच वातावरणात वाढलेली असल्यामुळे तिला ते उत्तम माहीत आहे. त्यामुळे तिला या विषयाला उपरोधिका विनोदाची, कारुण्याची झालर देता आली आहे. ऋषी कपूर, कोकणा सेन, फरहान अख्तर यांनी हा सिनेमा जिवंत केला आहे.

झोयाच्या सिनेमाचं वैशिष्टय़ म्हणजे बांधेसूद पटकथा, ठसठशीत व्यक्तिरेखा, तिला त्यांच्यामधून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट असं दाखवायचं नसतं तर माणसांच्या जगण्यातल्या ग्रे शेड्स ती पकडू शकते.  त्या व्यक्तिरेखांचा भाविनक चढउतार दाखवण्यावर तिचा हातखंडा आहे. ‘जिंदगी ना मिले दोबारा’मध्ये मित्राच्या बॅचलरेट पार्टीपेक्षाही तिथे जाऊन स्थायिक झालेल्या आपल्या वडिलांना भेटता येईल हा सुप्त हेतू ठेवून आलेला फरहान त्यांच्या घराच्या वाटेवर जाता जाता परत फिरतो. त्यांना भेटावंच लागतं तेव्हा त्यांची स्वार्थी वृत्ती बघून त्याचं आपल्या आईबद्दलच्या प्रेमानं मन भरून येतं, हे सगळं झोयाने इतक्या ताकदीने मांडलं आहे की बस. त्यात फरहानची व्यक्तिरेखा काय किंवा नासीरुद्दीन शहांची काय, या दोन्ही व्यक्तिरेखा सिनेमातल्या मुख्य व्यक्तिरेखा नसतानाही त्यांचा आलेख बारकाईने चितारला आहे. आपल्या व्यक्तिरेखांशी खेळायचं कसब तिच्याकडे आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा जराही फिल्मी न वाटता खऱ्या वाटायला लागतात.
जावेद अख्तरसारख्या दिग्गजाची ही मुलगी आपल्या पहिल्याच सिनेमात एकदम एक्स्ट्रॉ या विषयाकडे कशी वळली याचं अनेकांना कुतूहल होतं. त्याचं उत्तर आहे, झोयाच्या पाश्र्वभूमीत. १९ व्या वर्षी तिने बॉलीवूमडमध्ये काम करायला सुरुवात केली ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून. काही सिनेमांसाठी तिने कािस्टगही केलं. हे सगळं करताना तिचा सिनेमात काम करणाऱ्या एक्स्ट्रॉशी खूप जवळून संबंध आला. त्या अनुभवाचं रूपांतर पुढे लक बाय चान्स मध्ये झालं. झोया सांगते की लक बाय चान्स हा सिनेमा लिहिताना मला खूप मजा आली, पण मग त्यासाठी कािस्टग करताना त्यापेक्षा नकोच सिनेमा करायला असं वाटायला लागलं. सुरुवातीला तर तिने या सिनेमासाठी फरहान अखतरचा, तिच्या भावाचा विचारसुद्धा केलेला नव्हता. पण नंतर फरहानची त्यात एन्ट्री झाली. तोपर्यंत त्याने ‘फकीर ऑफ व्हेनिस’सारखा सिनेमा केलेला होता, त्यामुळे तो अभिनय करू शकतो यावर शिक्कामोर्तब झालं होतं. आता हा सिनेमा ती पुन्हा बघते तेव्हा तिला असं वाटतं की तिने ‘लक बाय चान्स’ आता केला असता तर आणखी वेगळा केला असता.

जावेद अख्तर आणि हनी इराणी यांची ही लेक. साहजिकच आपली सतत वडिलांशी तुलना होणार याची तिला नीट जाणीव आहे. त्यामुळे मी माझ्या वडिलांसारखीच आहे, हे ती सांगून टाकते. जावेद अख्तर या नावाची पाश्र्वभूमी असल्यामुळे आपल्याला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश सहज मिळाला, पण पुढची वाटचाल तुम्हालाच करावी लागते, स्वत:ला सिद्ध करावं लागतं असं तिला वाटतं.

झोयाचं शिक्षण झालं माणेकजी कूपर हायस्कूलला, तर कॉलेज शिक्षण झेवियर्सला. तिथून पदवी घेऊन ती फिल्म मेकिंग शिकायला न्यूयॉर्क विद्यापीठात गेली. तिथून परत आल्यावर झोयाने सिनेमाची वेगवेगळी तंत्रं समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या सिनेमांच्या सेटवर काम केलं. तिनं मीरा नायरबरोबर काम केलं. तिनं सिनेमात अभिनय करावा यासाठी मीरा नायरने खूप प्रयत्न केले. पण त्यातून झोयाला एवढंच समजलं की अभिनय हे तिचं क्षेत्र नाही. पण लहानपणापासून सिनेमा बघत, ऐकत-वाचत ती वाढली होती त्यामुळे तिला करायचा होता तो फक्त सिनेमाच. तिने पेंटागॉन नावाच्या रॉक बॅण्डसाठी ‘प्राइस ऑफ बुलेट्स’ या म्युझिक व्हीडिओतून आपल्या करिअरची सुरुवात केली. मग तिने काही सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून काम केलं. असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप एक्स्ट्रॉंबरोबर काम केलं. एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर म्हणून काम केलं. ‘ब्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडाइस’साठी गाणी लिहिली. ‘दिल चाहता है’ आणि ‘स्प्लिट वाइड ओपन’साठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं. ‘लक्ष्य’ आणि ‘दिल चाहता है’ या फरहान अख्तरच्या म्हणजे भावाच्याच सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. रीमा कागदीच्या ‘हनिमून ट्रॅव्हल्स’साठी एक्झिक्युटीव्ह प्रोडय़ुसरचं काम केलं. शिवाय ‘लक बाय चान्स’ जिंदगी ना मिले दोबारा’ ‘दिल धडकने दो’, ‘तलाश’ या सिनेमांची ती कथा- पटकथा लेखकही आहे. या सगळ्यातून तिला सिनेमाची अंगं समजत गेली आणि त्याचा दिग्दर्शनात उपयोग झाला. वडील लेखक-कवी, आजोबा, पणजोबा कवी-लेखक त्यामुळे लेखनाचं अंग तिच्याकडे होतंच. त्यामुळे तिची मत्रीण आणि पटकथा लेखक रीमा कागतीबरोबर तिने पटकथा लेखनही केलं. लेखक म्हणून तिला माणसांच्या जगण्याचं, वागण्याचं खूप कुतूहल वाटतं. या कुतूहलापोटी लोकांचं बारकाईनं निरीक्षण करायची तिला सवय आहे आणि या सवयीचा परिणाम म्हणजे ते सगळे बारकावे तिच्या व्यक्तिरेखांमध्ये उतरतात. ‘जिंदगी ना मिले दोबारा’मध्ये आपली महागडी ब्रॅण्डेड पर्स अगदी निगुतीने सांभाळणारी कल्की कोचलीन आणि त्यावरून बॅगवती असं त्या पर्सचं नाव ठेवून सतत तिची खेचणारा फरहान अख्तर हे त्यातूनच येतं.

फरहान अख्तरला भलेही ‘भाग मिल्खा भाग’साठी पुरस्कार मिळालेले असून देत, पण झोयाच्या सिनेमात त्याचा अभिनय विशेष खुलला आहे, तो तिच्या व्यक्तिरेखा मांडणीच्या कौशल्यामुळे. त्यामुळेच ‘लक बाय चान्स’मधला सुरुवातीला इतरांसारखाच धडपडणारा आणि नंतर संधी मिळाल्यावर बरोबरच्यांना ओळखही न देणारा स्वार्थी होतकरू अभिनेता फरहानने उत्तम साकारला आहे.

झोयाचं लहानपण बुद्धिवादी कुटुंबात गेल्यामुळे तिच्या सिनेमात धर्म, अंधश्रद्धा यांबाबतचे गोंधळ जरासुद्धा डोकावत नाहीत. आधुनिक माणसं आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष, त्यातून डोकावणारा त्यांचा नातेसंबंधांचे संघर्ष हेच तिचे विषय असतात. अर्थात हे विषय मांडणारा तिचा तिसरा सिनेमा ‘दिल धडकने दो’ मात्र सपशेल फसला. अनिल कपूर, शेफाली शहा,  प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा असं सगळं स्टारकास्ट असतानाही एका पंजाबी कुटुंबाची गोष्ट सांगणारा ‘दिल धडकने दो’ मात्र झोयाचा सिनेमा वाटलाच नाही. त्यानंतरची तिची वाखाणण्याजोगी कामगिरी म्हणजे ‘बॉम्बे टॉकिज’मधला सहभाग. दिग्दर्शक अनुराग कश्यपने भारतीय सिनेमाला १०० वष्रे झाल्याच्या निमित्ताने भारतीय सिनेमाला सलाम म्हणून बॉम्बे टॉकीजची निर्मिती केली. चार भागांच्या या एका सिनेमात चार दिग्दर्शकांनी आपली कलाकृती मांडायची होती. त्यात अनुरागबरोबर झोया, दिबांकर बॅनर्जी आणि करण जोहर होते. त्यात झोयाने केलेला ‘शीला की जवानी’ वाखाणला गेला. यानिमित्ताने सांगायचं म्हणजे अनुराग कश्यप आणि करण जोहर हे दोघंही आपले सगळ्यात जवळचे मित्र असल्याचं झोया सांगते. ही दोन्ही माणसं इतक्या वेगळ्या प्रकारची आहेत की त्यावरूनच झोयाच्या मत्रीच्या लवचिकतेची कल्पना येऊ शकते.

पंचेचाळिशीच्या झोयाला लग्न, जोडीदार याबद्दल प्रश्न विचारला जातोच. तेव्हा ती सांगते की आयुष्यभर साथ देणारा जोडीदार हवा असं मलाही वाटतंच, पण त्यासाठी लग्न केलंच पाहिजे असं थोडंच आहे.. आजही झोपेतून सकाळी मला जाग येते तेव्हा मला असं नाही वाटत की ‘अरे बापरे, अजून आपलं लग्न झालेलं नाही’.. तर झोपेतून जाग आली की सकाळी सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं, की ‘अरे बापरे किती दिवस झाले सिनेमा बनवला नाही’.. आई हनी इराणी, वडील जावेद अख्तर, भाऊ फरहान अख्तर आणि रिमा कागती ही मत्रीण हे झोयाचं प्रेमाचं वर्तुळ. आई-वडिलांच्या वेगळं होण्याचा तुझ्यावर काय परिणाम झाला, हा प्रश्न तिला हमखास नेहमी विचारला जातो. त्यावर झोयाचं उत्तर असतं की ज्यांचे आई-वडील एकत्र राहतात, वेगळे झाले नाहीत पण धुसफूस असते, मुलांना आई-वडिलांचं भावनिक आधार, प्रेम मिळत नाही असे अनेकजण मला माहीत आहेत. माझे आई-वडील एकत्र राहात नसूनही मला दोघांकडूनही या गोष्टी पुरेपूर मिळतात. सतत शिकत राहणं, वैचारिक खुलेपणा हे मी वडिलांकडून शिकले आहे. आपली स्पेस मिळवणं, दुसऱ्याला स्पेस देणं हे मी आईकडून शिकले आहे. त्या दोघांनीही मला चुकांमधून शिकायला शिकवलं. यापेक्षा आई-वडिलांकडून आणखी काय मिळवायचं असतं?
झोया न्यूयॉर्कमधून दिग्दर्शन शिकून आली तेव्हा तिला वाटायचं की आपले हात पोहोचलेच आभाळाला. त्या दिवसांबद्दल ती सांगते की त्यावेळी मी भयंकर उद्धट होते. मला वाटायचं की माझ्याशिवाय दुसरं कोण चांगला सिनेमा बनवू शकणार आहे? या क्षेत्रातले जवळचे अभिनेते, दिग्दर्शक मला चार गोष्टी समजावायचा प्रयत्न करायचे तर मला वाटायचं की मी एवढं शिकून आले आहे तर मला सांगणारे हे कोण? हा सगळा माझा उद्धटपणाच होता. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या सिनेमात काम करायला कुणी तयार होईना. शिवाय लोकांना वाटायचं की ही कसला व्यावसायिक सिनेमा काढणार. तेही बरोबरच होतं. आणि मला वाटायचं की मी मला हवा तसाच सिनेमा काढणार. मी कशाला लोकांची पर्वा करू. खरं तर आसपासचे लोक काय म्हणताहेत ते मला समजायचंच नाही. या सगळ्यातून ‘लक बाय चान्स’ केला आणि त्यातून मी खऱ्या अर्थाने खूप काही शिकले.

झोया खूप बॉसी आहे, असा ठपका तिच्यावर ठेवला जातो. ते तिला अजिबात पटत नाही. ती म्हणते, सेटवर पुरुष दिग्दर्शक लोकांना कसंही वागवतात, ते लोकांना चालतं, मी कसंही वागवत नाही, पण मला जे म्हणायचं असतं, करायचं असतं, त्याबद्दल मी आग्रही असते तर मला बॉसी म्हटलं जातं. स्त्रीनं कुठल्याही गोष्टीत स्पष्ट असणं हे बॉसी कसं काय असू शकतं. तुम्ही फार स्त्रीवादी आहात असंही मला सांगितलं जातं. पण मला तर उलट लोक स्त्रीवादी कसे नसतात याचंच आश्चर्य वाटतं. तुम्ही स्त्री-पुरुष समानता मानता ना, स्त्रियांनी शिकलं पाहिजे, त्यांचा त्यांच्या शरीरावर अधिकार हवा असं तुम्हाला वाटतं ना, त्यांना समान संधी, समान वेतन मिळायला हवं असं तुम्हाला वाटतं ना, मग तुम्ही स्त्रीवादी नाही असं कसं म्हणता येईल, असा तिचा रोखठोक प्रश्न असतो.

सुरुवातीच्या काळात जावेद अख्तर यांची मुलगी ही झोयाची ओळख असली तरी त्यापलीकडे जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्यात ती यशस्वी झाली आहे.

(संदर्भ : वेगवेगळ्या नियतकालिकांमधील मुलाखती)

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा