काही दिवसांपूर्वीच ‘धडक’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘सैराट’चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटातून ईशान खत्तर आणि जान्हवी कपूर हे नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. ‘धर्मा प्रॉडक्शन’च्या बॅनरअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहर पुन्हा एकदा स्टारकिड्सना चित्रपटसृष्टीत नवी ओळख देऊ पाहात आहे. पण, या साऱ्यामध्ये त्याच्यावर पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका करण्यात येत आहे.

Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या…

याविषयीच ईशान खत्तरचे वडील, राजेश खत्तर ‘डीएनए’शी बोलताना म्हणाले की, ‘या चित्रपटात ईशानची निवड करण्यास भाग पाडण्यात आले होते, असे नाही. पण, या चित्रपटाच्या कथानकासाठी त्याला १८ ते २१ वर्ष वयोगटातील तरुण कलाकारांची गरज होती. त्यासोबतच तो लोकप्रियतेपासून दूर असलेल्या चेहऱ्यांच्या शोधात होता. त्यामुळेच त्याने या दोघांची (इशान-जान्हवीची) निवड केली’, असे ते म्हणाले.
‘धडक’च्या मुद्द्यावरुन करण जोहरवर घराणेशाहीचा समर्थक म्हणून केल्या जाणाऱ्या टीकेविषयी खत्तर म्हणाले, ‘आपले मतप्रदर्शन करण्यासाठी सोशल मीडिया हे एक लोकप्रिय माध्यम आहे. पण, गेल्या काही दिवसांमध्ये या माध्यमाचा वापर इतरांवर टीका करण्यासाठी आणि त्यांची खिल्ली उडवण्यासाठी केला जातोय. जिथे उगाचच कोणत्याही गोष्टीवर अवाजवी मतं मांडली जातात.’. चित्रपटसृष्टीत कोणाचाही वरदहस्त नसणाऱ्या कलाकारांनाही तितकेच प्राधान्य दिले जाते, हे मत मांडत त्यांनी अभिनेता राजकुमार रावचे उदाहरण दिले. याशिवाय त्यांनी शाहिद कपूर आणि घराणेशाहीविषयीसुद्धा भाष्य केले.

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने…

‘शाहिदचे वडील पंकज कपूर आणि आई निलीमा अझिम हेसुद्धा फार लोकप्रिय चेहरे नव्हते. पण, तरीही त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. आजची परिस्थिती पाहिली तर शाहिदचा भाऊ असल्यामुळे अनेकजण ईशानवर निशाणा साधत आहेत’, असे ते म्हणाले. स्टारकिड्सचे नशिब आणि त्यांच्या वाट्याला येणारी लोकप्रियता या सर्व गोष्टींमध्ये चाहत्यांची महत्त्वाची भूमिका असते, असेही ते म्हणाले. आपल्या मुलाच्या म्हणजेच ईशानच्या बॉलिवू़ड पदार्पणासाठी सध्या ते आशावादी असल्याचे पाहायला मिळते.