‘रांझना’ या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल. राय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली होती. या चित्रपटाने धनुषला हिंदीत न भूतो न भविष्यति असे यश मिळवून दिले. धनुष आणि सोनम कपूर अशी कोणीही विचार करू शकले नसते, अशी जोडी एकत्र आणत दिग्दर्शक आनंद राय यांनी ही कमाल साधली होती. त्या पहिल्या चित्रपटापासून या दोघांची जोडी अशी जमली आहे की केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर चित्रपट निर्मितीसाठीही आनंद राय यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची तयारी धनुषने दाखवली आहे.
आनंद राय यांच्या ‘कलर यलो प्रॉडक्शन’ आणि ‘जार पिक्चर्स’ यांची संयुक्त निर्मिती असलेला अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘निल बटे सन्नाटा’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून कौतुकाची थाप मिळाली आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत प्रदर्शित व्हावा, अशी आनंद राय यांची इच्छा होती. त्यांनी धनुषसाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. आई आणि मुलीभोवती फि रणाऱ्या या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. एके री पालकत्वाच्या वेगवेगळ्या समस्यांशी आजचा समाज झगडतो आहे. अशा समाजात आपल्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा तिला कसा उपयोग करून घेता येईल, यासाठी झगडणारी प्रेमळ आई ही या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या बंडखोर मुलीला कुठलाही आरडाओरडा न करता अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी हटके आराखडे बांधणारी आई यांची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. रत्ना पाठक शहा, स्वरा भास्कर आणि पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
धनुषला हा चित्रपट आणि आनंद राय यांची कल्पना दोन्ही पसंत पडल्या असल्याने त्याने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी होकार दिला आहे. आनंद राय आणि धनुष दोघे मिळून या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीची निर्मिती करणार आहेत. ही कथा दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायलाच हवी, असे आपल्याला वाटत असल्याचे धनुषने म्हटले आहे. त्याने या चित्रपटाच्या तमिळ रिमेकसाठी स्वामित्व हक्कही विकत घेतले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते म्हणून एकत्र आलेली ही जोडी ‘रांझना’ नंतर पुन्हा हिंदी चित्रपटासाठी कधी एकत्र येणार, याची लोकांना उत्सुकता आहे.