काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची इंडस्ट्रीमध्ये २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. छोट्या पडद्यावर मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारा शाहरुख खान आज बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. शाहरुखने ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण शाहरुखला या चित्रपटात भूमिका कशी मिळाली हे जाणून घेण्यास चाहते फार उत्सुक आहेत.
१९९२ साली शाहरुखचा ‘दीवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख सोबत ऋषि कपूर आणि दिव्या भारतीने काम केले आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वात आधी चित्रपट निर्मात्यांनी सनी देओलची निवड केली असल्याचे म्हटले जाते. पण काही कारणास्तव सनी देओलने या भूमिकेसाठी नकार दिला.
सनी देओलने नकार दिल्या नंतर अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरुख खानचे नाव निर्मात्यांना सुचवले असल्याचे म्हटले जाते. धर्मेंद्र यांनी नाव सुचवल्यामुळे शाहरुखला ‘दीवाना’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर शाहरुखला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. ‘चमत्कार’, ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘बाजीगर’, ‘डर’, ‘करण अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मोहब्बतें’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले.