आयमॅक्स फॉरमॅटमध्ये अद्याप भारतातील एकही चित्रपट बनलेला नाही. ‘धूम थ्री’ हा यशराज फिल्म्स बॅनरचा पहिला भारतीय आणि हिंदी चित्रपट आयमॅक्स फॉरमॅटवर दाखविण्यात येणार असून देशभरातील आयमॅक्स चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
अधिक अद्ययावत प्रोजेक्शन सिस्टिमद्वारे नेहमीच्या पडद्यापेक्षा अधिक सुस्पष्ट प्रतिमा आणि उत्कृष्ट ध्वनी पोहोचविणारा आयमॅक्स डिजिटल फॉरमॅटमध्ये ‘धूम थ्री’ पाहायला मिळणार आहे. डॉल्बी डिजिटल यंत्रणा, डिजीटल तंत्रज्ञान तसेच मल्टिप्लेक्स आल्यानंतर सिनेमा पाहण्याची संकल्पना आमूलाग्र बदलली. आता आयमॅक्स फॉरमॅटवर बनलेला पहिला सिनेमा हा मान ‘धूम थ्री’ला मिळणार असून वेगवान अ‍ॅक्शनपट असल्यामुळे  या फॉरमॅटवर सिनेमा पाहण्याचा वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.  ‘धूम’ या पहिल्या सिनेमाच्या यशापासूनच वेगवान अ‍ॅक्शनपट आणि बॉलीवूडचे सर्व आघाडीचे कलावंत ही त्याची ख्याती अबाधित ठेवत या सिनेमाचा दुसरा सीक्वेलपट  ‘धूम थ्री’बद्दल बॉलीवूड क्षेत्रामध्ये बरीच चर्चा केली जाते. ‘धूम थ्री’मध्ये आमिर खान आणि कतरिना कैफ खलनायकी व्यक्तिरेखेत झळकणार असून अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा ‘धूम’, ‘धूम२’मधीलच पोलिसांच्या भूमिकेत झळकणार आहेत.