१९८५ साली प्रदर्शीत झालेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट मराठीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आजही या चित्रपटातील गाणी व डायलॉग्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात झळकलेले अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, प्रेमा किरण असे सर्वच कलाकार आज मराठीतील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु आज ती अभिनेत्री ओळखताही येणार अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे.

या अभिनेत्रीचे नाव ऐश्वर्या राणे. ऐश्वर्या यांनी ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. परंतु अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत.

ऐश्वर्या यांना ‘मर्द’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला होता. या चित्रपटात घोडेस्वारी करताना त्या पडल्या होत्या. दरम्यान त्यांच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली होती. परिणामी त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यानंतर उपचारासाठी त्या परदेशात देखील गेल्या होत्या. परंतु उपचाराचा खर्च त्यांना परवडला नाही. त्या ट्रिटमेंटसाठी ऐश्वर्या यांनी घर, दागिने इतकच नव्हे तर एफडीही मोडल्या. या सर्व प्रकारामुळे त्या कायमच्या सिनेसृष्टीपासून दूर गेल्या.

एका अपघातामुळे अपंग झालेल्या ऐश्वर्या यांना सध्या ‘सी’ ग्रेड पेन्शन मिळते आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सध्या त्या त्यांचे जीवन कंठत आहेत. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सरकार आता त्यांना ‘ए’ ग्रेड पेन्शन देणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.