सर्वसामान्य लोकांसोबतच आता सेलिब्रिटी देखील वीज बिल जास्त आल्यामुळे त्रस्त झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे, पूजा बेदी, हरभजन सिंह यांसारख्या काही सेलिब्रिटींनी वीज बिल जास्त आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता दिव्या दत्ता देखील वाढीव वीज बिलामुळे वैतागली आहे. लॉगडाउनचं बक्षीस घेताय का? असा सवाल तिने वीज कंपन्यांना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या दत्ताला तब्बल ५१ हजार रुपये वीजेचं बिल आलं आहे. “टाटा पावर हे नेमकं काय चाललं आहे? एका महिन्याचं बिल ५१ हजार रुपये? लॉकडाउनचं बक्षीस वसूल करताय का? हे बिल एवढं आलं कसं हे मला समजवा.” अशा आशयाचं ट्विट करुन दिव्याने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

का वाढवली जात आहेत विजेची बिलं?

राज्यातील अंदाजे २ कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांच्या वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत, या कारणांबाबत वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

“वीज बिलं वाढण्याचे पहिले कारण नैसर्गिक आहे. मार्च ते जून हा पूर्णपणे उन्हाळ्याचा कालावधी असल्याने तसेच या काळात लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वजण घरात बसून होते. त्यामुळे या काळात सर्व खोल्यांमधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू राहिल्याने वीज वापर वाढला आहे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे १ एप्रिल २०२० पासून झालेली वीजेची दरवाढ. १ एप्रिलनंतर हे पहिलेच बिल आहे आणि आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण दरवाढ माहीतीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात असंतोष, राग व नाराजी प्रकट करायला हवी,” अशी माहिती वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी येथे गुरुवारी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya dutta is shocked at getting electricity bill rs 51 thousand mppg
First published on: 27-07-2020 at 11:40 IST