आपल्याला असमान वेतन मिळत असल्याची तक्रार करण्यापेक्षा महिलांनी कमी मानधन देणा-यांसोबत काम करुच नका, असे फेमिनिस्टा सोनम कपूर हिने म्हटले आहे.
स्त्रीवादाची पुरस्कर्ती असलेली अभिनेत्री सोनम कपूर ‘मामी’ महोत्सवातील ‘मुव्ही मेला’ या कार्यक्रमाला उपस्थित होती. मी संपूर्णपणे स्त्रीवादी आहे आणि हे सांगण्यास मला अजिबात लाज वाटत नाही असे म्हणत सोनम म्हणाली की, स्त्रिया आपल्याला समान मानधन मिळत नसल्याची तक्रार करतात आणि मी हे समजूनदेखील घेते. पण, जर तुम्हाला वाटते की तुम्ही कशासाठी तरी पात्र आहात तर त्याकरिता लढा. मात्र, त्याबाबत नुसती तक्रार करत बसू नका. मी स्वतः स्त्रीवादी आहे. स्त्रीवादी असणे म्हणजे काही मुलगा-मुली असा भेद मी मानत नाही. माझा स्त्रीवाद हा तुम्ही कोण आहात आणि जे योग्य आहे त्यासाठी न घाबरता लढा देण्याविषयी आहे. यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे माझे वडिल आहेत. कारण, ते मला आणि माझ्या बहिणीला नेहमीचं प्रोत्साहन देतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ते माझ्याकडे बघतात, बहुतेक लोक जे करू शकत नाही, ते या मुली करु शकतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासाठी माझे वडिल हे स्त्रीवादी आहेत.
याच कार्यक्रमाच्या दुस-या एका भागात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्याला मिळत असलेल्या मानधनबाबत अजिबात दुःख नसल्याचे सांगितले. मात्र, आजच्या पिढीला मिळणा-या मानधनात काहीतरी साम्य असावे असे म्हटले.