एकांकिका स्पर्धातून अनेक नवे रंगकर्मी घडल्याची, नवी नाटकं रंगभूमीला मिळाल्याची बरीच उदाहरणे आहेत. ही परंपरा आताच्या काळातही सुरू आहे. नुकतीच ‘संगीत देवबाभळी’ आणि ‘भूमिका’ ही दोन नाटकंही एकांकिका स्पर्धातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीत रंगभूमीला पुन्हा ऊर्जतिावस्था यावी, या हेतूनं थिएटर अ‍ॅकॅडमीनं रंगसंगीत संगीत एकांकिका स्पर्धा सुरू केली. नाशिकच्या स्पंदन या संस्थेची संगीत देवबाभळी ही एकांकिका २०१६ मध्ये या स्पध्रेत विजेती ठरली होती. या स्पध्रेनंतर इतर दोन-तीन स्पर्धामध्ये या एकांकिकेनं बरीचं पारितोषिकं पटकावली. मात्र, पाहणारा प्रत्येकजण या एकांकिकेला केवळ स्पध्रेपुरतं मर्यादित ठेवू नका, अशी सूचना लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याला करत होते. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या स्पध्रेत भद्रकाली प्रॉडक्शन या प्रतिथयश संस्थेचा निर्माता प्रसाद कांबळी याने देवबाभळी ही एकांकिका पाहिली आणि त्याचं दोन अंकी नाटक करून व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे एक नवं संगीत नाटक बऱ्याच काळानंतर मराठी रंगभूमीवर आले आहे. आवली, तुकाराम, विठ्ठल आणि रखुमाई यांच्यातल्या नातेसंबंधांवर हे नाटक बेतलं आहे. तुकारामांचे अभंग आणि नव्या रचनांतून या नाटकाचं संगीत करण्यात आलं आहे. आनंद ओक यांनी नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचं नेपथ्य केलं आहे. मानसी जोशी आणि शुभांगी सदावत्रे यांनी नाटकातल्या भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाचा प्रयोग रविवारी (७ जानेवारी) यशवतंराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

नाटकाविषयी प्राजक्त देशमुख म्हणाला, आमच्या प्रयत्नांना यश मिळालं याचं पूर्ण श्रेय थिएटर अ‍ॅकॅडमी आणि भद्रकालीचे प्रसाद कांबळी यांना आहे. कारण रंगसंगीत ही स्पर्धा नसती, तर आम्ही संगीत एकांकिका करू शकलो नसतो. त्यानंतर प्रसाद कांबळीनी पाठपुरावा केला नसता, तर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं नसतं. एका स्पध्रेत सादर केलेली संगीत एकांकिका आता व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाच्या रूपात दाखल झाल्याचा प्रचंड आनंद आहे. एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर आणताना प्रसाद कांबळी यांनी संपूर्ण मोकळीक दिली.’

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची भूमिका ही एकांकिकाही नुकतीच व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाली आहे. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर ही एकांकिका बेतली आहे. गौरव बर्वे आणि चिन्मय पटवर्धन यांनी कथेच्या नाटय़रूपांतरासह दिग्दर्शनही केलं आहे. पुरुषोत्तम करंडक स्पध्रेसह विविध स्पर्धामध्ये ही एकांकिका सादर झाली होती. लेखक-दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी आणि वेल्थ प्लॅनेट यांनी ही एकांकिका व्यावसायिक पद्धतीनं करण्याची कल्पना मांडली. कलाकारांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यावसायिकदृष्टय़ा रंगमंचावर आणताना मूळ एकांकिकेत काही बदल करून भर घालण्यात आली आहे. नाथ पुरंदरे, मुग्धा भालेराव, गौरव बर्वे, चिन्मय पटवर्धन, अभिषेक रानडे यांच्या नाटकात भूमिका आहेत. या नाटकाचा प्रयोग मंगळवारी (९ जानेवारी) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री साडेनऊ वाजता होणार आहे.

एकांकिका व्यावसायिक पद्धतीनं करताना आम्ही नाटकाचा पुन्हा विचार केला. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचाही विचार केला. त्यातून नवा दीर्घाक उभा राहिला. या प्रक्रियेत आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, असं गौरव बर्वेनं सांगितलं.  तरुणाईच्या सर्जनशीलतेतून व्यावसायिकदृष्टय़ा काहीतरी नवी, ऊर्जादायी कलाकृती घडू शकते हे या दोन्ही एकांकिकांतून दिसून आलं आहे. आता गरज आहे, ती जाणत्या रंगकर्मीनी तरुणांना प्रोत्साहन देण्याची आणि मार्गदर्शन करण्याची!

chinmay.reporter@gmail.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama competition
First published on: 04-01-2018 at 03:49 IST