महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, २ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रवींद्र नाटय़ मंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे सायंकाळी ५.४५ वाजता होणार आहे.
मुंबई, ठाण्यासह विविध विभागांतील हजारो गणेशभक्तांनी त्यांच्या घरातील गणपतीची आकर्षक व पर्यावरणस्नेही आरास छायाचित्रांच्या माध्यमातून पाठविली होती. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणजतन आणि संवर्धनाच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर या विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर न करता पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्यांनी छायाचित्र व सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी पाठविणे अपेक्षित होते. स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांमधून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मिती क्रिएशन्स निर्मित ‘हे गणनायक’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. निसर्गातल्या परमेश्वराचे स्वरूप आणि सगुण साकार गजाननाचे रूप या ‘हे गणनायक’ कार्यक्रमातून रसिकांपुढे मांडण्यात येणार आहे. नचिकेत देसाई, विद्या करलगीकर हे गायक तर अमेय ठाकूरदेसाई, दिगंबर जाधव, अनिल गावडे हे वादक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सत्यजित प्रभू यांचे आहे. श्वेता पडवळ व सहकारी नृत्ये सादर करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांचे आहे.
केसरी, जनकल्याण सहकारी बँक, रिजन्सी ग्रुप, चितळे डेअरी यांचे प्रायोजकत्व या कार्यक्रमाला लाभले आहे.
मुंबई विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे
दत्तात्रय कोठूर (प्रथम), विनोद घोलप (द्वितीय)
उत्तेजनार्थ- विजया वाकचौरे, महेश तांडेल, आकाश शिंदे, रवींद्र चिटणीस, संजय कराड, संतोष वर्टेकर, अभिनय पाटील, अमोल वैद्य, अमोल दांडेकर, अनिल बानपेल, दीपक कापुरे, डॉ. दीपक बडवे, देवेंदू सावंत, दिनेश धोकडे, ज्ञानसा वाघमारे, प्रफुल्ल चितळे, दीप्ती गुर्जर, मकरंद देसाई, मनीषा ओझरकर, मयुर अजिंक्य, नयना पल्हाडे, नीलेश पवार, पूजा साटम, प्रकाश नाईक, प्रशांत पाटील, योगेश मालंडकर, रोहित केरेकर, देवदत्त राऊत, ज्योती लईजावाला, श्रीराम महाजन, तुषार रामगुडे, गीत नाईक, मंदार राजाध्यक्ष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly ganesh festival competition award distribution on tuesday
First published on: 30-11-2014 at 06:53 IST