एकता कपूरचा भलता नियम..

कलाकारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

डिजिटलचे वारे वेगाने वाहू लागल्यावर आपल्या अपयशी ठरत चाललेल्या चित्रपट उद्योगाचा गाशा तात्पुरता गुंडाळून एकता कपूरने वेब सीरीजच्या निर्मितीची वाट धरली. सध्या तरी सेन्सॉरच्या कात्रीपासून लांब असलेल्या या डिजिटल विश्वात एकता कपूरचं बरं चाललंय तसं.. पण तिथे कुठल्या प्रकारचा आशय जास्त खपतो, याचे गणिती ज्ञान आकळलेल्या एकताने लगोलग आपल्या कलाकारांसाठी किचकट नियम टाकायला सुरूवात केली होती. दोन वर्षांपूर्वी एकताने आपल्या डिजिटल व्यासपीठावर एक्सएक्सएक्स ही सीरीज निर्माण करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी यापुढे ज्यांना तिच्या अल्ट बालाजी कंपनीअंतर्गत काम करायचं असेल त्यांनी आपण नग्न दृश्ये साकारण्यास तयार आहोत, असे क रारात लिहून दिले पाहिजे ही अट घातली होती. आता त्यापुढे जात कलाकारांना रोखठोक भाषा वापरावी लागेल, असा आणखी एक नियम तिने करारात अंतर्भूत केला असल्याने कलाकारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. याआधी ठराविक वेब सीरीजपुरती मर्यादित असलेली अट एकताने सरसकट सगळ्याच कलाकारांना लागू केली आहे. अल्ट बालाजीच्या मालिकांमध्ये काम करायचे असेल तर पटकथेच्या मागणीनुसार कलाकारांनी आपल्या मर्जीने आशय उलगडून दाखवणारी रोखठोक भाषा वापरायला हवी, त्यांना जरूरीनुसार शरीर प्रदर्शनही करावे लागेल, असेही तिने या नियमात स्पष्ट केले आहे. हा नियम मान्य असेल तरच त्यांना अल्ट बालाजीची निर्मिती असलेल्या वेब सीरिजमध्ये काम करता येईल. अन्यथा आताही जे काम करत आहेत त्यांनी या करारावर स्वाक्षरी न केल्यास त्यांना त्यांचे उर्वरित मानधन देऊन अल्ट बालाजीमधून बाहेर काढले जाईल, असे एकताने स्पष्ट केले आहे. तिच्या या नव्या नियमामुळे अर्थातच सध्या तिच्या वेब सीरिजमध्ये काम करत असलेल्या कलाकारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अनेकांनी हा नवा नियम मान्य नसल्याने अल्ट बालाजीमधून काढता पाय घेतला आहे.

एकता कपूरने हा नियम तातडीने करारात अंतर्भूत करण्यामागे तिला निर्माता म्हणून आलेले अनुभव कारणीभूत ठरले आहेत. अनेकदा पटकथेची आवश्यकता असूनही कलाकार मी अमूक एक शब्द वापरणार नाही, असे दृश्य देणार नाही असे सांगत चित्रिकरणातच अडथळे निर्माण करत आहेत, हे तिच्या लक्षात आले. नंतर हे वाद होऊ नयेत म्हणून कलाकारांकडून आधीच या नियमांवर स्वाक्षरी करून द्यावी, असा आदेश एकताने दिला आहे. कलाकार सोडून गेले तरी चालतील मात्र नंतर होणारे नुकसान नको, असा पवित्रा तिने घेतला आहे. सध्या तरी तिच्या या नियमामुळे इंडस्ट्रीत वादळ निर्माण झालं आहे हे नक्की..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ekta kapoor alt balaji

ताज्या बातम्या