रेश्मा राईकवार

एखाद्या चित्रपटाविषयी आपल्याला खूप उत्सुकता असते. शफक खान दिग्दर्शित ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट याआधी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून फिरला आहे, त्याला पुरस्कारही मिळाले. त्यामुळे कुठे तरी दुष्काळी भागातील कथा रंगवणाऱ्या या चित्रपटात असं काय आहे जे जगभरातील लोकांना जोडून घेत असेल? हा प्रश्न पडतो. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील इतर दुष्काळी गावांप्रमाणेच असलेल्या एका गावाची ही छोटेखानी गोष्ट त्यातल्या बालकलाकारांनी कमाल आनंददायी केली आहे.

‘येरे येरे पावसा’ ही नावाप्रमाणेच यंदा तरी पाऊसपाणी पडू दे म्हणून देवादिकांपासून ते जिल्ह्यातील कार्यालयापर्यंत सगळीकडे गाऱ्हाणी घालून, खेटे मारून दमलेल्या गावकऱ्यांची गोष्ट आहे. अनेकदा समस्यांची जाण आपल्याला असते. ती नेहमीच शासनदरबारी सुटणार नाही हेही अनुभवाने कळून चुकलेलं असतं. एकत्र येऊन सोडवायचा प्रयत्न केला तर जगण्याची आशा वाढेल आणि नाही केला तर एक तर गाव सोडून जावं लागेल किंवा मरणाची वाट पाहात तिष्ठत राहावं लागेल. पाऊस नाही, गावात पाणी आणेल अशी योजना नाही, गावातल्या विहिरी आटत चालल्या आहेत, सरकारदरबारी खेटे मारूनही पाण्याच्या टँकरची व्यवस्था होत नाही. हे सगळं असंच सुरू राहिलं तर गावच्या गाव मरणपंथाला लागेल, याची जाणीव गावकऱ्यांना आहे; पण तरीही धर्म-जाती, अहंकाराच्या छोटय़ा-मोठय़ा दरी आड येत राहतात. मोठय़ांची गोष्ट पाहणारे छोटे मात्र एकत्र येतात आणि आपल्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.

भूषण दळवी यांनी बांधेसूदपणे कथा-पटकथा लेखन केलं आहे. त्यामुळे कथेचा जीव छोटा असला तरी मूळ विषय आणि त्याचे इतर महत्त्वाचे पैलू सगळे कवेत घेत चित्रपट कथेशी प्रामाणिक राहिला आहे. दिग्दर्शक शफक खान यांनी छोटय़ांकडून ही मोठी गोष्ट खूप सुंदर आणि सहज पद्धतीने काढून घेतली आहे. फार कुठेही न रेंगाळता, काही तरी शिकवण देतो आहोत असा आव न आणता सहज गोष्टी-खेळात एक मोठी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शकाने चांगला प्रयत्न केला आहे. दुष्काळी गाव खूप छान पद्धतीने चित्रित झालं आहे. चित्रपटात छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, प्रदीप नवले यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत; पण खरी गंमत आणली आहे ती यातल्या बालकलाकारांनी. सलमान, आनंद, रघु, पावटय़ा, नाम्या, रुपा, चेंडय़ा ही सगळीच मंडळी धमाल आहेत. हिंदी चित्रपट आणि कलाकारांचा पगडा असलेला सलमान, अभ्यासात हुशार असलेला न्यूटन म्हणजेच नाम्या, दोस्तांसाठी काय पण करायला तयार असणारा पावटय़ा, या बालदोस्तांचा दादा आनंद या सगळय़ा व्यक्तिरेखा त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ासह खूप सुंदर उतरल्या आहेत आणि त्या सगळय़ा बालकलाकारांनी उत्तम वठवल्या आहेत. आनंददादाचं प्रेमात पडणं हा जसा या सगळय़ांसाठी उत्सव ठरतो, तसंच एरव्ही शांत असणारं गाव छोटय़ा-छोटय़ा गोष्टीवरून धार्मिक-जातीय दंगलीत पेटून निघतं, गावच्या जगण्यातला हा विरोधाभास लेखक-दिग्दर्शक जोडीने खूप सुंदर रंगवला आहे. मोठय़ांनाही अवघड वाटणारी गोष्ट कित्येकदा छोटे अत्यंत निरागसतेने पूर्ण करतात तेव्हा जगण्याचं शहाणपण हे एकमेकांबरोबर मिळून राहण्यात आहे हा मोठा धडा आपल्याला मिळतो, हे सहजतेने या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचतं.

येरे येरे पावसा

दिग्दर्शक – शफक खान

कलाकार – संदेश जाधव, मिलिंद शिंदे, छाया कदम, प्रदीप नवले, आर्या आढाव, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश कुरळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, विनायक पोतदार.