हरयाणाच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतर तिच्यावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर तर सर्वत्र मानुषीचीच चर्चा पाहायला मिळाली. जवळपास शंभरहून अधिक सौंदर्यवतींना मागे टाकत भारताचे नाव मोठे करणाऱ्या मानुषीला तिच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मिस वर्ल्ड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. पण, मॉडेलिंगकडून अध्यात्माकडे वळलेल्या सोफिया हयातने मात्र मानुषीच्या यशावर आपले वेगळेच मत मांडले. मिस वर्ल्ड ही सौंदर्यस्पर्धा कालबाह्य झाली असल्याचे मत मांडत तिने काही प्रश्नही उपस्थित केले.
सोफियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मानुषीचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये आपले विचार मांडले. ‘अजुनही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते? मला वाटले होते, की डायनासोरच्या प्रजाती नष्ट झाल्या तेव्हाच या स्पर्धांचे आयोजन करणेही थांबवले होते’, असे सोफियाने या कॅप्शनच्या सुरुवातीलाच लिहिले. सौंदर्याची परिभाषा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी असते, तर मग अशा स्पर्धांचे आयोजनच का केले जाते, असा सवाल तिने या पोस्टमधून केला.
https://www.instagram.com/p/BbraDNzluyG/
वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…
मिस वर्ल्ड स्पर्धेविषयी आपले ठाम मत मांडत सोफियाने लिहिले, ‘सौंदर्याला कोणताच चेहरा नाही, तर मग या स्पर्धेचे परीक्षण करणारे ते लोक कोण आहेत? त्या ठिकाणी हिजाब घातलेली कोणी महिला का नाही? कोणी सोमालियन मुलगीही तेथे नाही, कोणी पेंटेड अमेरिकन भारतीय महिला तेथे का नाही? कोणी तृतीयपंथीही तिथे का नाही? या सर्वजणी सुंदर नाहीत का? मिस वर्ल्ड ही स्पर्धा आता कालबाह्य झाली आहे. कारण, खरी मिस वर्ल्ड तर ती आहे जी कोणाचीतरी आई आहे, जिच्या चेहऱ्यारवर सुरकुत्या आहेत.’ सोफियाची ही पोस्ट वाचून अनेकांनीच तिचे समर्थन केल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात सौंदर्याची परिभाषा गेल्या काही वर्षांमध्ये बदलली असून, त्याचे मोजमाप करण्याचे निकषही तितक्याच झपाट्याने बदलल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा एकच मुद्दा अधोरेखित करत सोफियाने केलेली ही पोस्ट अनेकांचेच लक्ष वेधत आहे.