नटणं सजणं हा स्त्रियांचा हक्काचा आणि आवडीचा प्रांत आहे असं म्हणतात. परंतु टीव्हीवरील सध्या सुरु असलेल्या ऐतिहासिक मालिका पाहिल्यास स्त्रियांच्या बरोबरीने पुरुष कलाकारांच्या दागिन्यांवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या टीव्हीवर महाराणा प्रताप, जोधा अकबर, महादेव या तीन मालिकांमध्ये सर्वश्रेष्ठ मालिका आपलीच ठरावी याकरता निर्मात्यांनी कंबर कसली आहे. या तिन्ही मालिकांमध्ये ‘महादेव’ या मालिकेतील दागिन्यांचा खर्च प्रतिदिन तब्बल ७५ ते ८० लाखांच्या घरात असल्याचे सूत्रांकडून कळते. या खालोखाल जोधा अकबर व महाराणा प्रताप या मालिकांचा क्रमांक लागतो.
बालाजी टेलिफिल्मस् सारख्या नामांकित कंपनीचा सहभाग असल्यामुळे मालिकांच्या निर्मितीची गणिते बदलू लागली आहेत. खास ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करतांना त्यामध्ये प्रत्येक गोष्ट अचूक असावी याकडे लक्ष दिले जाते. म्हणूनच सध्याच्या घडीला निर्मिती संस्था यातील लाखोंच्या खर्चालाही मागे पुढे पाहात नसल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणूनच कलाकारांचे दागिने आणि ओव्हरऑल गेटअपवर जवळपास लाखोंचा खर्च केला जात आहे. ऐतिहासिक मालिकांना असणारा प्रेक्षकवर्ग आणि त्याला मिळणारा टीआरपी यामुळे चॅनल्सही काही बाबतींमध्ये आग्रही आहे.
महादेव ही मालिका टीआरपीच्या गणितात सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेवर दिवसाला अदमासे ७५ ते ८० लाख खर्च केले जात आहेत. या मालिकेमधील महादेवच्या विगवर जवळपास  तीन लाखांचा खर्च येत असल्याचेही समजते. महादेव या मालिकेचे बहुतांशी शूटींग हे नायगाव येथील स्टुडिओमध्ये करण्यात येते. या मालिकेला आवश्यक असा सेट त्यासह अनेक छोटय़ा गोष्टी मालिकेचे बजेट वाढविण्यास कारणीभूत आहेत. सध्या जोधा अकबर या मालिकेमधील जोधाच्या अंगावरचे दागिने तब्बल पाच लाखांचे असून या दागिन्यांच्या व्यतिरिक्त जोधाचे कपडे आणि त्या अनुषंगाने येणारे विविध कलाकुसरीचे दागिने यावरही लाखोंचा खर्च होत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ही केवळ इमिटेशन ज्वेलरी नसून यातील काही दागिने अस्सल सोन्याचेही आहेत. बालाजी टेलिफिल्मस् निर्मिती करत असलेली जोधा अकबर मालिकेतील अनेक गोष्टींवर स्वत: एकता कपूर जातीने लक्ष देत असल्याचेही सांगण्यात येत आहे. अकबरच्या पेहरावापासून ते जोधाच्या दागिन्यांपर्यंत एकता खास आग्रही आहे. दागिन्यांचा नेमका खर्च कळू शकला नसला तरीही तोही प्रतिदिन लाखोंच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले.