बॉलीवुड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक, गीतकार अशा सगळ्याच आघाडय़ांवर निपुण असलेल्या फरहान अख्तरविषयी गेले काही दिवस सगळ्याच वाईट गोष्टी कानावर पडत आहेत. त्याच्यासारख्या अष्टपैलू कलाकाराची कारकिर्द बाजूलाच राहिली, उलट त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त आहे. घटस्फोटानंतर त्याचे नाव प्रत्येक अभिनेत्रीबरोबर जोडले जाऊ लागले आहे. मात्र सध्या या वाईट गोष्टींमधून वाट काढत त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती पुढे आली आहे.
एकाच वेळी निर्माता म्हणून सक्रिय असलेल्या फरहानने आपला महत्वाकांक्षी चित्रपट ‘रईस’ पुढच्या वर्षी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या काळात तो स्वत: ‘रॉक ऑन’च्या सिक्वलमध्ये काम करतो आहे. पाठोपाठ त्याने आणखी एक चित्रपट निश्चित के ला आहे. निखिल अडवाणीची निर्मिती असलेल्या ‘लखनौ सेन्ट्रल’ चित्रपटासाठी त्याने होकार दिला आहे. निखिलकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या रजित तिवारीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असणार आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या एका व्यक्तीवर आधारित ही कथा आहे. यात फरहान तुरुंग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रिकरणही तुरुंगातच होणार आहे. मुंबईतच स्टुडिओमध्ये तुरूंगाचा सेट लावून चित्रिकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. फरहानचा घटस्फोट झाल्यानंतर ‘रॉक ऑन’चा सिक्वल वगळता त्याच्या अन्य कुठल्याच चित्रपटाविषयी बोलले जात नव्हते. त्याउलट, आधी त्याचे नाव अदिती राव हैद्रीशी जोडले गेले. त्यानंतर श्रध्दा कपूरशीही त्याचे नाव जोडले गेले मात्र श्रध्दाने याचा कडवा विरोध केल्याने ही चर्चा थांबली. चित्रपट आणि म्युझिक कॉन्सर्ट या दोन्ही गोष्टी सांभाळणारा फरहान पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. ‘लखनौ सेन्ट्रल’ चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत असणार आहे. रितेश सिधवानीबरोबर या चित्रपटाची सहनिर्मिती करण्याचाही फरहानचा विचार सुरू आहे.