जागतिक पितृ दिन म्हणजेच फादर्स डे येत्या रविवारी जगभरात साजरा करण्यात येईल. खरं तर आई-वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणा एका विशिष्ट दिवसाची गरज नसते. पण, तरीही अशा या दिवसांच्या निमित्ताने काही जणांना आपल्या पालकांविषयीच्या भावना त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळते. अशाच काही आपल्या मनात असलेल्या वडिलांविषयीच्या भावना अभिनेत्री रसिका सुनील आणि रीना अगरवाल यांनी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे बाबा सुनील धबडगावकर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जेवढे काही बोलू तेवढे कमी आहे. त्यांना नेहमीच माझ्या कामाचे खूप कोडकौतुक असते. माझ्या आगामी ‘बसस्टॉप’ सिनेमाची एक्साईटमेंट माझ्यापेक्षा अधिक त्यांना आहे. मी लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे. पण कधी कधी मी खूप अतरंगीपणा करायचे, असं बाबा बोलतात.

वाचा : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘कूल बाबा’

फादर्स डे निमित्ताने एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, माझ्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. तो असा की,  मी, आई आणि बाबा डोंबिवली स्टेशनला होतो त्यावेळी खूप धो-धो पाऊस पडत होता. रेल्वे स्थानकावर खूप गर्दी असल्यामुळे सर्वजण आपापली छत्री संभाळत चालत होते. पाऊस जास्त असल्यामुळे बाबांनी मला खादंयावर घेतलं होत. मात्र तिथे देखील मला स्टंटबाजी करायची शक्कल सुचली आणि बाबांच्या खांद्यावरुन भर पावसात मी उसळी मारली. बाबांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला पण मी सटकले. तेवढ्यात त्यांनी छत्री उलटी केली आणि मला छत्रीत झेलंल… अक्षरशः पडता पडता मी वाचले होते, त्यानंतर बाबांनी पुन्हा मला त्यांच्या खांदयावर पकडून बसवलं. खूप भन्नाट किस्सा होता तो. मात्र आता जसजशी मी मोठी होत गेले, स्वतःमध्ये बदल घडवत गेले आणि मागच्या चुका सुधारल्या. माझ्या या सर्व धडपडीच्या प्रवासात बाबा मला सांभाळत आले आहेत, आणि आज देखील तितक्याच तत्परतेने मला सांभाळत आहेत.
– रसिका सुनील, अभिनेत्री

वाचा : मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटतो
माझे बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यातला परफेक्शनीस्टपणा आमच्यावर बिंबवला आहे. माझ्या बाबांकडून मी अनेक गुण आत्मासात केले आहेत,  त्यापैकीच बाबांकडून मिळालेला पहिला गुण म्हणजे स्वावलंबीपणा. सेटवर असताना स्वतःची लहान मोठी कामे करणे, दुसऱ्या व्यक्तीवर अवबंलून न राहण हे मी बाबांकडून शिकले आहे. बाबा नेहमी सांगतात प्रत्येकाने स्वतःची कामे शक्य तेवढी स्वबळावर करायला हवी. त्यांच्या सर्व शिकवणीचा आता मला खूप फायदा होतो आहे. लहानपणापासूनचं त्यांनी मला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं आहे.  मग ते करिअर निवडण्यापासून असो ते आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबाबतचे असो, बाबा नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. वेळ ही एक आयुष्यातली महवाची गोष्ट असल्यामुळे ती पाळायलाच हवी असा अट्टाहास बाबांचा असतो, आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवते आहे. माझ्या शूटींगच्या ठिकाणी तसेच कुठे फंक्शन असेल, तर मी नियोजित वेळेच्या पाच मिनिटे आधीच तिथे पोहोचलेली असते. त्यामुळे अनेकदा माझे कौतुक देखील करण्यात आलं आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. मी त्यांची मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो.
-रीना अगरवाल, अभिनेत्री

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day 2017 mazhya navryachi bayko fame rasika sunil talking about her father
First published on: 16-06-2017 at 13:43 IST