एकेकाळी चित्रपट किंवा मालिकांमधून व्यग्र असणारे मराठी कलाकार सध्या एकाचवेळी चित्रपट, मालिका, नाटक अशी कसरत करताना दिसत आहेत. सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई – मायेचं कवच’ या मालिकेतून एका कणखर आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले मात्र याला अपवाद ठरली आहे. करोनाने आपल्याला काही शिकवलं असेल तर ते म्हणजे तब्येतीचं महत्त्व.. असं ती म्हणते. त्यामुळे फिटनेसचे वेगवेगळे प्रकार करून पाहण्यात आणि त्याविषयी इतरांना सांगण्यात रमणारी भार्गवी करोनानंतर पहिल्यांदाच नृत्याचे जाहीर कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही आनंदी आहे.

मी करोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी दोनच चित्रपट केले होते. त्यातला रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘गुल्हर’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. तर ‘रावस’ हा आणखी एक चित्रपट केला आहे. हा चित्रपट मासेमारी क्षेत्राशी संबंधित कथेवर आधारित मात्र हत्या आणि त्याची रहस्यमयी उकल अशा शैलीतील आहे, असं भार्गवी सांगते. करोना काळात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया एकूणच गुंतागुंतीची झाली आहे. आर्थिक नुकसानही असल्याने अनेक मराठी चित्रपट अडकले आहेत, ते आता हळूहळू लोकांसमोर येतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. मालिका की चित्रपट? कलाकारांसाठी काय महत्त्वाचं असतं असा प्रश्न अनेकदा कलाकारांना केला जातो. या दोन्ही माध्यमांची ताकद वेगळी असली तरी चित्रपट हे माध्यमच मुळात दिग्दर्शकाचं आहे, असं ती म्हणते. चित्रपटांचा विचार करताना दिग्दर्शकाला त्यातून नेमकं काय सांगायचं आहे, त्याने गोष्ट कशी फुलवली आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. अशावेळी चित्रपटातील आपल्या भूमिकेची लांबी-रुंदी यांचा विचार करून चालत नाही. एखाद्या चित्रपटातील तुमचे दोन ते तीन मोजक्या पण महत्त्वाच्या दृश्यातील तुमचे काम वर्षांनुवर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहते, असं सांगताना ती ‘उंबरठा’सारख्या चित्रपटाचं उदाहरण देते. ‘उंबरठा’ या चित्रपटात स्मिता पाटील यांची भूमिका सगळय़ात मोठी आणि महत्त्वाची होती. मात्र त्यांच्याबरोबरीने अनेक छोटय़ा – छोटय़ा व्यक्तिरेखाही या चित्रपटात आहेत ज्या आपल्या लक्षात राहतात, असं भार्गवी सांगते.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

मालिकेतून एका शहरी उच्चभ्रू वर्गातील आई जी आपल्या मुलीला एका मोठय़ा गुन्हयातून बाहेर काढू पाहते आहे, अशी भूमिका भार्गवी करते आहे. तर दुसरीकडे ‘गुल्हर’मध्ये ती एका धनगर कुटुंबातील महिलेची भूमिका करते आहे. मराठीत सध्या विविध विषय हाताळले जात आहेत. ‘गुल्हर’ चित्रपटाची कथा धनगर समाजावर बेतलेली आहे, मात्र तीही एका आईचीच भूमिका आहे, असं ती स्पष्ट करते. मूल होत नाही म्हणून खंतावणाऱ्या अनेक स्त्रिया समाजातील विविध स्तरांत पाहायला मिळतात. इथे ही आई आपल्या पुतण्यालाच मुलगा मानते. त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. या चित्रपटाची भाषा ही खूप वेगळी आणि गोड आहे. साधी – सरळ कथा असलेला हा चित्रपट, त्यातला भाषेचा गोडवा, धनगर समाजाच्या संस्कृतीची झलक दाखवणारी पण साधीशीच वेशभूषा असे अनेक पैलू या चित्रपटाला आहेत जे प्रेक्षकांना आवडतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी आणि लेखक संजय नवगिरे यांनी इतकी तयारी आधीच करून ठेवली की आपल्याला वेगळं काही करावं लागलं नाही. जिथे चित्रीकरण सुरू होतं तिथल्या धनगर वस्तीत राहून त्यांची भाषा, राहणीमान अनुभवत अगदी सहजतेने ही भूमिका करता आली, असं तिने सांगितलं. मात्र त्याचवेळी इथे दिग्दर्शकाचा विचार वेगळा ठरतो हे सांगायला ती विसरत नाही. मूळ भावभावना या कोणत्याही कथेत सारख्याच असतात, त्यामुळे दिग्दर्शक आपली कथा कशी सांगतो यावर त्याचं वेगळेपण अवलंबून असतं, असं ती स्पष्ट करते.

‘आयपीएल’चा  परिणाम होतोच..

आयपीएलसारख्या महत्त्वाच्या गोष्टी आल्या की त्याचा मालिकांच्या टीआरपीवर परिणाम होतोच. कलाकार म्हणून या गोष्टीचा विचार करावा लागतो. मालिका हे माध्यम असं की इथे आपण रोज दिसत असल्याने रोजच्या रोज चांगलं काम करावं लागतं. चित्रपटाचं तसं होत नाही. एकदाच काम केल्यावरही आयुष्यभर तुम्हाला ओळख मिळते. मालिकेसाठी आयपीएलच्या काळात अधिक मेहनत करावी लागते, असं भार्गवी सांगते.

पॉवर योगा, एरियल योगा..

फिटनेसच्या बाबतीत दक्ष असलेली भार्गवी योगा करायला आपल्याला आधीपासूनच आवडतं असं सांगते. करोनाने आपल्याला फिटनेस किंवा तब्येत सांभाळणं किती महत्त्वाचं आहे हे शिकवलं आहे. आणि त्या काळात वेळही भरपूर मिळाल्याने मी अँटी ग्रॅव्हिटी योगा, पॉवर योगा, एरियल योगा असे वेगवेगळे प्रकार शिकले आणि ते करून दाखवायलाही मला आवडतात, असं ती सांगते. याशिवाय, नृत्याचे कार्यक्रम करायलाही तिला खूप आवडतं. १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाहीर नृत्याचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली असल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.